पुणे : मळद परिसरात बेसुमार वाळू उपसा | पुढारी

पुणे : मळद परिसरात बेसुमार वाळू उपसा

रावणगाव, पुढारी वृत्तसेवा : मळद (ता. दौंड) येथील ओढ्यातून दिवस-रात्र बेसुमार वाळू उपसा चालू असून, महसूल व पोलिस प्रशासन वाळूचोरांना अभय देत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. वाळूचोरीचे पंचनामे करून तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

मागील महिनाभरापासून रावणगाव मंडल कार्यक्षेत्रातील मळद परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर व जेसीबी मशिनच्या साह्याने ओढ्यामध्ये वाळू उपसा होत असताना प्रशासन बघायची भूमिका घेत आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. सतत पडणार्‍या पावसात अवैध वाळू उपशाने या भागातील रस्ते जागोजागी खराब झाले असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

गावकामगार तलाठी, मंडलाधिकारी हे अर्थपूर्ण संबंधांतून वाळूचोरीकडे दुर्लक्ष करीत असून, वाळू उपशावरील कारवाईदरम्यान प्रतिक्रिया विचारली असता बोलण्यास टाळाटाळ करतात. वाळू उपशाने ओढ्याच्या पात्रात मोठे खड्डे पडले असून. शेतकर्‍यांचे नुकसानही होत आहे.

Back to top button