राजकीय स्वार्थासाठी औरंगाबादच्या नामांतराचा ठराव : इम्तियाज जलील | पुढारी

राजकीय स्वार्थासाठी औरंगाबादच्या नामांतराचा ठराव : इम्तियाज जलील

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा: शिवसेना-भाजप केवळ राजकीय स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर करतात. त्यामुळे या ऐतिहासिक शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा ठराव मंजूर केला आहे, असा आराेप एमअआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. शहराचे नाव बदलाच्‍या   ठरावाला शहरवासीयांचा तीव्र विरोध असून, जनभावना दाखविण्यासाठीच हा मुकमोर्चा काढण्यात आला, असेही त्‍यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे खोटं बोलतात, असे म्हणत झूट बोले कंवा काटे, असा टाेलाही त्‍यांनी लगावला.

या वेळी इम्तियाज जलील म्हणाले की, राजकीय स्वार्थासाठी औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला. २०१४ मध्ये राज्यात युतीचे सरकार असताना हा निर्णय का घेण्यात आला नाही, असा सवाल करत सत्तेची खुर्ची जाण्याची वेळ आल्यावर हा निर्णय घेण्यात आला, अशी टीका जलील यांनी यावेळी केली. स्वार्थासाठी संभाजीराजेंच्या नावाचा वापर केला जात आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर तयार करा आणि त्या शहराला संभाजीराजेंचे नाव द्या, असे आवाहनही त्‍यांनी केले.

शहरातील भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुपारी ३.१५ वाजता सर्वपक्षीय मुकमोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या विविध भागातून नामकरणाविरोधात नागरिक सहभागी झाले. भर पावसात मोर्चेकरी आमखास मैदानावर दाखल झाले. दरम्यान, या मोर्चातून सरकारला नामांतराविरोधात जनमत दाखविण्यात आले आहे. यावरही निर्णय बदलला नाही. तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही खा. जलील यांनी दिला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button