औरंगाबाद : तहसीलदारांच्या नोटीसनंतरही पाझर तलावात उत्खनन सुरूच | पुढारी

औरंगाबाद : तहसीलदारांच्या नोटीसनंतरही पाझर तलावात उत्खनन सुरूच

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते कामासाठी थेट पाझर तलावातूनच मुरुमाची उचल केली जात आहे. महिनाभरापासून हा प्रकार पैठण तालुक्यातील रांजणगाव, पैठणखेडा परिसरात सुरू असून नाममात्र रॉयल्टीचा भरणा करून ठेकेदाराने आतापर्यंत शेकडो ट्रक मुरूम नेल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

परंतु अद्याप तहसील कार्यालयाने कुठलीच कारवाई केलेली नाही. शासकीय योजनेतील बांधकाम असो की, रस्ते काम, यासाठी लागणारी वाळू, मुरूम आणि खडी ही रॉयल्टी भरणा करूनच ठेकेदाराला देण्यात येत असते. शिवाय या गौण खनिजाची उचल कोणत्या ठिकाणाहून करावी, ते देखील जिल्हा गौण खनिज, महसूल विभागाद्वारेच निश्चित केले जाते. परंतु पैठणमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून होत असलेल्या रस्ते कामात मुरूम उचलण्यासाठी ठेकेदाराने या सर्व नियमांना हरताळ फासला आहे. प्रशासनाने निश्चित करून दिलेल्या जागेतून मुरुमाची उचल न करता, थेट पाझर तलावातच उत्खनन केले जात आहे. केंद्र सरकारच्या योजनेतील रस्त्याचे काम आहे, असे सांगून ठेकेदार महिनाभरापासून अवैधरीत्या मुरुमाची उचल करीत आहे. दरम्यान आतापर्यंत मोठ्याप्रमाणात
उत्खनन झाले आहे. त्यामुळे पाझर तलाव पोखरला गेला असून रॉयल्टी नेमकी किती भरली. हे मात्र प्रशासनाला अद्यापही माहिती नाही. याबाबत पैठण तहसीलदार दत्ता निलावाड यांनी ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. परंतु अद्यापही हे उत्खनन थांबलेले नाही.

चौकशी अहवाल एसडीएमकडे पैठणखेडा आणि रांजनगाव परिसरातील पाझर तलावात सुरू असलेल्या उत्खननाचा पंचनामा तयार करून अहवाल उपविभागीय अधिकारी (एसडीएम) स्वप्निल मोरे यांना सादर केला आहे. यात आतापर्यंत केलेले उत्खनन आणि भरण्यात आलेली रॉयल्टीची देखील माहिती आहे.
– दत्ता निलावाड, तहसीलदार, पैठण

Back to top button