सोलापूर : वेळापूर पालखीतळाची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी | पुढारी

सोलापूर : वेळापूर पालखीतळाची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

वेळापूर , पुढारी वृत्तसेवा :  संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा 6 जुलै रोजी वेळापूर मुक्कामी येत असून याबाबतच्या ग्रामपंचायत व प्रशासनाच्या तयारीची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी वेळापूर येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी तळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी पालखीतळावरील आरोग्य, पाणीपुरवठा, मोबाईल शौचालयांची व्यवस्था, विद्युतीकरण, स्वच्छतेबाबतचा आढावा, पालखीतळ, शहर पालखीमार्ग यांची माहिती वेळापूर ग्रामविकास अधिकारी दीपक गोरे यांच्याकडून घेतली.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. मात्र, या वर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी संप्रदाय सहभागी होणार असल्याने या पालखी सोहळ्यासाठी वारकर्‍यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्यावतीने काळजी घेतली जात आहे. या पालखी सोहळ्यातील भाविकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेळापूर ग्रामपंचायतीच्यावतीने उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वेळापूर सरपंच विमल जानकर यांच्या नेतृत्वाखाली पालखी सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात येत आहे.

यावेळी विविध खात्यांच्या संबधित अधिकार्‍यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सीईओ दिलीप स्वामी यांनी पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत शुद्धीकरण करण्यात यावेत, माऊलींची स्वयंस्फूर्तीने सेवा करण्यासाठी किमान 50 स्वयंसेवकांची तत्काळ नेमणूक करावी, वेळापुरातील सर्व हॉटेलमधील काम करणारा कर्मचारीवर्ग यांची आरोग्य तपासणी करून घेणे, वारकर्‍यांच्या स्वच्छतेसाठी एक हजार मोबाईल टॉयलेट देण्यात येणार असून त्या ठिकाणी पाणी व लाईटची सोय तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, शाखा अभियंता दरवेशी, कृषी विस्तार अधिकारी शिखरे, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button