

पोथीबद्ध जुनाट आचार-विचारांना महात्मा जोतिबा फुल्यांनी बुद्धिप्रामाण्यतेच्या कसोटीवर घासून आव्हान दिले अन् त्यामुळे स्वार्थ बुडू लागलेल्या धर्मनिष्ठांनी १८५५ मध्ये त्यांच्या हत्येचा डाव रचला. जोतिबांनी मारेकऱ्यांचीच मने जिंकून घेतल्याने तो डाव फसला…, मात्र त्यानंतर तब्बल १५८ वर्षांनी त्या निष्ठुर धर्मनिष्ठांची सरशी झाली, जोतिबांच्या पुढच्या शतकातल्या धर्मचिकित्सकाची २० ऑगस्ट २०१३ ला निर्घृण हत्या करण्यात आली. जोतिबांना मारण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांचा विचार दबू शकला नाही, तो त्यांच्या हयातीतच नव्हे तर त्यानंतरच्या दीडशे वर्षांत सर्वदूर पसरला. तसेच नव्या पिढीतल्या जोतिबांना, डॉ. नरेंद्र दाभोलकरांना ठार करण्यात आले, पण त्यांचा विचार संपला नाही. त्यांना मारणाऱ्यांची नावे अन् त्यांचा द्वेष पुसला जाईल, पण दाभोलकरांचा कृतीशील विवेकवाद पुसला तर जाणार नाहीच आणि त्याच्या प्रकाशातच आधुनिक महाराष्ट्राला पुढची वाटचाल करावी लागेल.
जोतिबांच्या हत्येचा प्रयत्न झाला, त्यावेळचे सनातनी समाजमन एकवेळ समजू शकते. समानतेची मूल्ये अन विज्ञानाधिष्ठित ज्ञानाची पहाट नुकतीच होऊ लागली होती अन् त्यामुळे जुन्या-जीर्ण, विषमता पसरवणाऱ्या धर्मकल्पनांची लक्तरे करून वेशीवर टांगणाऱ्या समाजक्रांतिकारकाचा सूड घेण्याची इच्छा, त्याच्याविषयीची चीड त्या कल्पनांवरच पोट असणाऱ्या पुरोहित-प्रस्थापित वर्गामध्ये निर्माण झाली असल्यास नवल नव्हते, परंतु बुद्धिप्रामाण्यवाद हा पाया असलेल्या पाश्चात्य विद्येचे-मानवी मूल्यांचे-समानतेच्या तत्त्वाचे रोपटे रुजून त्याचा वटवृक्ष झालेला असतानाच्या काळात, खुळचट धर्मकल्पना जमिनीत गाडल्या गेल्या असतानाच्या काळातही कोणताही स्वार्थ नसणाऱ्याचा, केवळ समाजाचे भले एवढाच हेतू ठेवून धर्मचिकित्सा करणाऱ्याचा जीव घेण्याची इच्छा त्याच पोथीनिष्ठांना होणे याचा अर्थ काय? अजूनही अर्थहीन कर्मकांडात गुरफटलेल्या धर्मकल्पनांच्या, उच्चनीचतेच्या जाणिवा बोथट झालेल्या नाहीत, हाच याचा अर्थ. कथित सुशिक्षितांमध्ये त्या जाणिवा अधिक टोकदार, अधिक प्रखर झाल्या आहेत, हाच याचा अर्थ.
… आणि म्हणूनच एकोणिसाव्या शतकातल्या जोतीबांप्रमाणेच विसाव्या शतकातल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्याचा कट पुराणमते कवटाळणाऱ्या प्रस्थापित वर्गाने रचला. मारेकऱ्यांच्या पावलांचा आवाज आल्याने त्यांच्याशी बोलण्याची, त्यांचे मन वळवण्याची संधी जोतिबांना मिळाली अन् त्यातून त्यांचे मनपरिवर्तन झाले. आधुनिक काळामुळे दाभोलकरांच्या मारेकऱ्यांकडे आधुनिक शस्त्रे आल्याने त्यांच्याशी बोलण्याची संधीच त्यांना मिळाली नाही.
जोतिबांनी महार-मांगांसारख्या दीनदलितांच्या मुलींसाठी १८४८ पासून शाळा काढल्या, त्याला 'अब्रह्मण्यम' म्हणत पुण्यातील बहुसंख्य ब्राह्मण्यग्रस्त वर्गाने विरोध केला. शाळेत शिकवायला जाणाऱ्या सावित्रीबाईंच्या अंगावर चिखल-दगडांचा वर्षाव केला, पण त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला नाही. शिक्षणकार्य करताकरता जोतीराव समाजाच्या होत असलेल्या धार्मिक शोषणाकडे वळले मात्र, या प्रस्थापित वर्गाने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. खुळचट धार्मिक कल्पना मनात भरवून पुरोहित वर्ग अज्ञानी, अशिक्षित वर्गाचे कसे शोषण करतो आहे, याचे वर्णन जोतिबांनी 'तृतीय नेत्र' या आपल्या छोटेखानी नाटकामध्ये १८५५ मध्ये केले मात्र, त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्यावर हल्ला झाला.
जोतिबांचे काम विसाव्या शतकात पुढे चालू ठेवणाऱ्या दाभोलकरांची अवस्था काही वेगळी नव्हती. समाजातल्या अंधश्रद्धांविरोधात दाभोलकर आवाज उठवू लागले, तेव्हा सनातनी धर्ममार्तंड त्याला विरोध करत होते, मात्र ही चळवळ पुढे मोठ्या वादळाचे रूप घेऊ लागली, दाभोलकरांचे प्रहार अधिक अचूक, अधिक खोलवर, अधिक परिणामकारक, अधिक बोचरे, धर्मरूढींना अधिक आव्हान देणारे होऊ लागले, तेव्हा आपल्या हितसंबंधांवर घाला घातला जाऊ लागल्याने प्रस्थापित अस्वस्थ होऊ लागले. "धार्मिकतेच्या कच्च्या मालावर धर्मविद्वेषाची, धर्मांधतेची प्रक्रिया केली की मतपेटीतून सत्तेचा पक्का माल बाहेर येतो," असा त्यांनी झगझगीत प्रकाशझोत टाकला. "धर्माचं सांस्कृतिकीकरण केलं जातयं अन् सांस्कृतिक राष्ट्रवाद आणला जातोय," असे ठाशीवपणाने हे नवे जोतिबा मांडत राहिले… अन् त्यातून त्यांच्या विरोधातला राग भडकत गेल्याचे दिसून आले.
बुवाबाजी-भोंदूपणा आणि त्यातून होत असलेले धार्मिक-आर्थिक-मानसिक शोषण यांना डॉक्टरांकडून विरोध होऊ लागल्याने त्या त्या बाबांचा भक्तसंप्रदाय नाराज होई, पण व्यापक समाजमानस हे भोंदूगिरीच्या विरोधात असल्याने समानमनाचा त्याला पाठिंबाच मिळत असे. पुढे समाजातल्या या अंधश्रद्धांविरूद्ध चळवळ करताकरता डॉक्टर धर्माची कडक चिकित्साही करू लागले आणि त्यामुळे मात्र सनातन्यांमध्ये अस्वस्थता पसरू लागली.
"महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अलिकडच्या काळात लोकवर्गणी जमते ती धार्मिक सप्ताहांसाठी, जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अन् नव्यांच्या उभारणीसाठी. त्यामुळे लोकवर्गणीतून होणारी पाणी, रस्त्यांसारख्या विकासाची कामंच आता होईनाशी झाली आहेत. ज्या समाजात धार्मिक, जातीय अस्मिता टोकदार, बळकट, धारदार करण्याचा कार्यक्रम होतो, त्या समाजात अंधश्रद्धा दूर करणं अवघड असतं," असे ते निदर्शनाला आणू लागले. अंधश्रद्धा बाळगणे, पसरवणे आणि त्यातून शोषण करणे या गोष्टींना गुन्हा ठरवून त्या विरोधात कायदा आणण्याची लोकचळवळ सुरू झाली. त्यासाठी श्याम मानव यांच्या प्रमाणेच डॉक्टरांनीही कंबर कसली. लोकप्रतिनिधी, सामाजिक-धार्मिक नेते यांच्या बरोबर चर्चेचा कीस पाडण्यात आला. त्यात डॉक्टर आघाडीवर होते. ' 'अंधश्रद्धा' शब्द नको, जादूटोणा विरोधी कायदा म्हणा', अशी सूचना पुढे आली आणि ती अखेरीस मान्य झाली. याबाबतचा कायदा मंजूर झाला, त्यामागे डॉक्टरांचा सिंहाचा वाटा होता. जसजसा काळ पुढे चालला होता, तसतशी डॉक्टरांची धर्मचिकित्सा अधिक प्रखर, प्रभावी होत होती.
"… २००८ मध्ये दोन लाख ब्राह्मण जमतात, त्यात एक विदुषी 'ब्राह्मण्य जानव्यात नाही, गंधात नाही' असं सांगतात, तेव्हा त्यांना माफी मागावी लागते. प्रत्येक जातीच्या-धर्माच्या नावाने अस्मिता बळकट, धारदार, टोकदार करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, अशा वेळी अंधश्रद्धा निर्मूलन होणार कसं?." असे डॉक्टर परखडपणे विचारू लागले.
… हेच दाभोलकर जेव्हा "सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढवण्याचा पद्धतशीर कार्यक्रम सुरू आहे," असे सुनावू लागले तेव्हा सनातन्यांच्या कपाळाला आठ्यांचे भलेथोरले जाळे पडले.
"धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा अविभाज्य भाग. संसदेलाही या तत्त्वात बदलाचा अधिकार नाही, पण धर्माचं जमातीकरण करणं अन् सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढवणं सुरू आहे." "शहरातला गणपती उत्सव पुढं खेड्यात पोचला. तो कमी पडू लागला म्हणून आपण नवरात्र आणली, त्यात मजा येईना म्हणून मग गरबा आला. त्यानंतर ऑगस्टमध्ये कृष्णाष्टमी असल्याने आपण हंडी लावून ती फोडू लागलो. काही वर्षांनी मग डिसेंबरात वॉर्डावॉर्डात दत्ताचे पाळणे हलू लागले. महाशिवरात्रीला भलीमोठी पोस्टर लागली, रथयात्रा सुरू झाल्या. एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर रामनवमी साजरी होऊ लागली, त्याच्या भक्ताची हनुमानाची जयंती त्यानंतर लगेच होऊ लागली. असे बहुधा ऑगस्टपर्यंतचे महिने संपले, मग मार्च राहिला, पण मंडळी हुशार होती. त्यांनी गुढीपाडवा हा आपला नववर्ष दिन म्हणून साजरा करायला सुरूवात केली. १ जानेवारीचा नववर्ष दिन पिण्यासाठी आणि पाडव्याचा मिरवणुकीसाठी….एकदम महाराष्ट्र असा धार्मिक झाला काय? मार्गशीर्षातलं वैभव महालक्ष्मीचं व्रत पर्यावरणाची ऐशी की तैशी करत साजरं होऊ लागलं. या व्रतानं वैभव मिळत असतं तर अर्थमंत्र्यांनाच ते करायला लावलं असतं."
" धर्माचं व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण, राजकारण हे सांस्कृतिक राष्ट्रवादासाठी आणि धर्मसापेक्ष जमातवादासाठी करण्याचं कटकारस्थान सुरू झालं. लोकांची धार्मिकता हा आदर करण्यासारखा भाग, संतांनी ही धार्मिकता नैतिकतेकडे वळवली. यांनी मात्र ती धर्मांधतेकडे वळवली. धर्म संदेश काय देतो? आणि आपण काय करतो?" असा प्रश्न दाभोलकर विचारत आणि "सत्तेवर यायचं तर लोकांची मतं मिळवून यावं. इथं मात्र धर्माचं सांस्कृतिकीकरण केलं जातंय, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणला जातोय. धर्माचं राजकारण करताना धार्मिकता हा कच्चा माल वापरून त्यावर धर्मविद्वेषाची, धर्मांधतेची प्रक्रिया करण्यात आली आणि मतपेटीतून सत्तेचा पक्का माल बाहेर काढण्यात येऊ लागला," असे प्रतिपादन ते निडरपणाने करू लागले…
… आणि २०१३ मधील २० ऑगस्टचा दिवस उगवला. या दिवशी एकशेसाठ वर्षांच्या प्रबोधनाची, परिवर्तनाची चळवळ स्तब्ध झाली, महात्मा फुल्यांनी दीडशेवर वर्षांपूर्वी बुद्धिप्रामाण्यतेचे-चिकित्सेचे रोपटे विषमता पेरणारा 'आर्यभटाचा धर्म' नाकारून लावले, दलितांमध्ये प्रखर स्फुल्लिंग पेरून आणि "तुमचे म्हणणे माझ्या मताच्या विरोधात असले तरी तुम्हाला तुमचे म्हणणे मांडता यावे, यासाठी मी प्राणपणाने झगडीन," असे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या रोपट्याचे संगोपन केले. लोकहितवादी, गोपाळ गणेश आगरकर, राजारामशास्त्री भागवत, राजा राममोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, महादेव गोविंद रानडे, बाबा पदमनजी, डॉ. रामकृष्ण भांडारकर, शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, विठ्ठल रामजी शिंदे आदी अनेकांच्या अथक प्रयत्नांमुळे त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे मानले जाऊ लागले. त्यामुळे आधुनिक काळात विचारांची लढाई ही विचारानेच लढली जाईल, मुद्द्यांचे उत्तर गुद्द्यांनी मिळणार नाही, असा भरवसा येत चालला होता.
लोकशाही मूल्ये जोपासली जाऊ लागली होती. विवेकवादाची कास धरण्याची आणि विचारांच्या आदानप्रदानाने जुन्या धर्माला आधुनिक काळानुसार प्रवाही, अर्थपूर्ण, मानवहितकारी, स्नेहाद्र रूप देण्याची फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीपासून सुरू झालेली प्रक्रिया अधिक परिपक्व होत असल्याचा विश्वास येऊ लागला होता. नेमक्या अशाच वेळी दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि दीडशे वर्षांतील सत्यशोधकी हजारो ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम मातीमोल झाले. पुरोगामित्वाची बिरूदे मिरवणारा-विचारमंथनात देशाचे नेतृत्व करणारा महाराष्ट्र एकशेसाठ वर्षे मागे गेला.
महाराष्ट्रजनांमध्ये केवळ बाह्य वागणुकीत आधुनिकता आली, पण मनोवृत्ती मात्र तशीच कर्मठ, सनातनी आणि हिंसक राहिल्याचे आणि आपण अजूनही १८४० च्या वातावरणातच रेंगाळत असल्याचे त्यामुळे सिद्ध झाले…
युरोपामध्ये समानता, न्याय, बंधुता आदी उच्च मानवी तत्त्वे रूजली आणि त्यांच्या फळांचा उपभोग त्या देशांतले नागरिक घेत आहेत. मग आपल्या देशात, पुरोगामी म्हणवण्यात येणाऱ्या महाराष्ट्रात या तत्त्वांचा परिचय झाल्यानंतरही आणि अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केल्यानंतरही विज्ञानवाद, बुद्धिप्रामाण्यवाद सर्वसामान्यांच्या हाडीमाशी का खिळू शकला नाही ? दाभोलकरांच्या हत्येसारखे प्रसंग का घडताहेत ?…
दाभोलकर यांच्याच शब्दांत सांगायचे तर विज्ञान युग आले तेव्हा युरोपात जशी वैचारिक घुसळण झाली तशी ती आपल्याकडे झाली नाही. "धर्मग्रंथात काहीही सांगितले असेल, पण मला जे पटेल तेच मी मानेन," असे म्हणणाऱ्या रॉजर बेकनला तो धर्मगुरू असूनही वीस वर्षांची शिक्षा झाली. 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य फिरत नाही,' असे ब्रूनोने सांगितल्यावर त्याला सत्तेने रोममध्ये खांबाला बांधून जाळले. गँलिलिओनेही तेच सांगितले, तर त्याला आजन्म कारावास भोगावा लागला. ही प्रबोधनाची घुसळण होती. शोधकता, कृतीशीलता, निर्भयता अशी ही बहुआयामी गोष्ट होती.
शास्त्रज्ञ सत्य सांगत होते. कलावंत चर्चला धुडकावून लावून कलेचा आविष्कार करत होते. 'पोपची गरज नाही', असे प्रोटेस्टंट म्हणत होते. युरोपात अशी एक वैचारिक रणधुमाळी चार ते पाच शतके चालली, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मानस घडत गेले. भारतात विज्ञान आले, वैज्ञानिक दृष्टिकोन आला, पण तो उपरा आला. ब्रिटिशांना हवे तेवढेच त्यांनी आणले. भांडवलशाहीला भांडवल संचय करावा लागला नाही. एका बाजूला दलाली-सावकारी आणि दुसरीकडे सरंजामशाही होती. ब्राह्मण-बनियांच्या हाती ज्ञानसत्ता आली. वैज्ञानिक दृष्टिकोनाची शोधकता आली, पण निर्भयता आणि कृतीशीलता यांचा संबंध आला नाही. अंधश्रद्धेवर प्रहार करणे अशक्य मानले जाऊ लागले. लोकही तसेच आचरण करू लागले. सत्यशोधक चळवळीत निर्भयता, शोधकतेची परंपरा होती, पण आजच्या काळातील प्रस्थापितांचे त्या परंपरेला काय उत्तर आहे ?… तर दाभोलकर यांना गोळ्या घालणे.
… या सरंजामी, बुरसटलेल्या, झापडबंद, पोथीनिष्ठ, सनातनी प्रवृत्तींना एक ढळढळीत सत्य समजलेले नाही आणि ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला ठार करून त्याचे विचार मरत नाहीत. महात्मा गांधी यांच्या विचारांशी तुम्ही असहमत असू शकता, पण त्याचा विरोध चर्चेने झाला पाहिजे, त्यांना गोळ्या घालून नव्हे. गांधींना गोळ्या घातल्या तरी त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत. दाभोलकरांना गोळ्या घातल्या तरी दाभोलकरांच्या मांडणीला, त्यांच्या चळवळीला गोळ्या घालता येत नाहीत. एक दाभोलकर तुम्ही मारले, पण त्यांच्या हौतात्म्यातून हजारो दाभोलकर उभे राहात आहेत, युरोपप्रमाणे काहीशे वर्षांच्या प्रबोधनाच्या घुसळणीची गरज या देशाला असेल आणि त्यानंतर विवेकाचे, सामंजस्याचे, बंधुभावाचे, समानतेचे नवनीत बाहेर पडणार असेल तर हौतात्म्यासाठीही शेकडो दाभोलकर तयार होत आहेत… अंतिम विजय मात्र झुंडशाहीचा, धर्मांधतेचा, संकुचिततेचा नसेल तर मानवतेचा, समानतेचा, न्यायाचा, धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा असेल…
हे ही वाचा :