रक्तपुरवठा बंद पडल्याने निकामी झालेल्या पेशींवर यशस्वी उपचार..! | पुढारी

रक्तपुरवठा बंद पडल्याने निकामी झालेल्या पेशींवर यशस्वी उपचार..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रक्तपुरवठा बंद पडल्याने हाडांच्या पेशी निकामी होण्याच्या स्थितीला ‘अव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस’ म्हणतात. एक तरुण महिला या आजाराने ग्रस्त होती. पारंपरिक उपचारांनीही खुबा व नितंबातील वेदना कमी होत नव्हत्या. अशा वेळी अत्याधुनिक उपचारपद्धतीने शस्त्रक्रिया करून महिलेला बरे करण्यात डॉक्टरांना यश मिळाले. महिला रुग्णाच्या रेडिओलॉजिकल तपासण्यांमधून अव्हॅस्क्युलर नेक्रॉसिसचे निदान झाले.
त्यानंतर मणक्यात भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. निकामी झालेल्या पेशी क्युरेट हे शस्त्रक्रिया उपकरण वापरून अचूकतेने काढण्यात आल्या. निरोगी हाडांच्या पेशींना धक्का न लावता बाधित झालेली जागा साफ करता आली. रुग्णाच्या मानेतून हाडाचा तुकडा या साफ केलेल्या बाधित जागेत बसविण्यात आला. त्यानंतर पेशींच्या पुनर्निर्मितीसाठी बोनमॅरो अ‍ॅस्पिरेट कॉन्सन्ट्रेट  (बीएमएसी) हे इंजेक्शन देण्यात आले. रुग्णालयात एक-दोन दिवसांच्या देखभालीनंतर महिलेला घरी सोडण्यात आले.  प्रक्रियेत वापरले जाणारे स्वयं-शोषक टाके दोन आठवड्यात पडले आणि हळूहळू रुग्णाला आपले दैनंदिन कार्य सुरू करता आले.
अभिनव वैद्यकीय पद्धतीचा महत्त्वाचा घटक म्हणजे रुग्णाच्या मानेतील हाडांचा तुकडा (बोन प्लग) काढून निकामी झालेल्या पेशींच्या जागी बसवून दरी भरून काढणे हे होते. यामुळे हाडांची योग्य पुनर्निर्मिती झाली. अशा आव्हानात्मक स्थितीचा सामना करणार्‍या रुग्णांमध्ये अत्याधुनिक तंत्रामुळे नवीन आशा निर्माण झाली आहे.
– डॉ. किरण खरात,  ऑर्थोपेडिक व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, रुबी हॉल क्लिनिक
हेही वाचा

Back to top button