औरंगाबाद : शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडले; पीककर्ज मिळेना | पुढारी

औरंगाबाद : शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडले; पीककर्ज मिळेना

पाचोड, पुढारी वृत्तसेवा :  यांत्रिकीकरणाद्वारे करण्यात येणारी शेताची नांगरणी, वखरणी, रोटावेटर आदी मशागतीच्या कामासह मजुरीचे दर वाढत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतातील कामाकरिता मजूर मिळणे कठीण झाले आहे. शिवाय
बियाण्यांचे दरसुद्धा गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत आहे.

पाचोडसह परिसरात शासकीय, राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा सहकारी बँकसुद्धा आहे. या बँकांमार्फत करण्यात येणार्‍या पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया तालुक्यात धिम्या गतीने सुरू असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. शेतात पेरणी करण्यासाठी बियाणे व खते विकत घ्यायला पैसा वेळेवर मिळत नसल्याने शेतकर्‍यांची धावपळ होत आहे. जे, अनेक बँकेने यंदा नियमित कर्ज भरणार्‍यांना वाढीव कर्जवाटप अत्यंत कमी प्रमाणात केल्याने काही जणांना कर्जाची परतफेड करताना भरलेली रक्‍कमही नवीन कर्ज वाटपानुसार मिळाली नसल्याचे काही शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकर्‍यांकडून यापूर्वी घेतलेल्या पीक कर्जाचा भरणा करून घेतला; परंतु त्यांना नव्याने वाटप देण्यासाठी 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. परिसरातील काही अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकर्‍यांना पाहिजे असलेले नामांकित कंपन्यांचे व दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध नसल्याने हा साठा आला होता का आणि तो कुठे गेला असा प्रश् न विचारला जात आहे.

अनुदानित बियाण्यांसाठी जाचक अटीने हैराण

ज्या शेतकर्‍यांनी अनुदानित बियाण्याकरिता महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केले, त्यांची ऑनलाइन लॉटरीद्वारे बियाणे वाटपाकरिता निवड झाली; परंतु यामध्ये कृषी विभागाने जाचक अटी घालून बोळवण केल्याचा आरोप शेतकर्‍यांतून होत आहे. या बियाणे वाटपाकरिता एका गावातून 25 पेक्षा कमी शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज केले असतील तर त्यांना अनुदानित बियाणे मिळण्याकरिता परमिटचे वाटप करण्यात आले नाही.

Back to top button