सोलापूर : अग्‍निपथ योजनेविरोधात आज सोलापुरात आंदोलन | पुढारी

सोलापूर : अग्‍निपथ योजनेविरोधात आज सोलापुरात आंदोलन

सोलापूर , पुढारी वृत्तसेवा :  भारतीय सैन्यदलातील भरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निपथ योजना त्वरित मागे घेण्याच्या मागणीसाठी डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियातर्फे (डीवायएफआय) सोमवारी (दि. 20) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सचिव बालाजी कलेटवाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, सरकारने कंत्राटी पद्धतीवर नव्हे, तर नियमित भरती करणे गरजेचे आहे. सैन्य दलासारख्या अतिसंवेदनशील आणि महत्त्वाच्या क्षेत्राचे कंत्राटीकरण करण्याचे काम केंद्र सरकार अग्निपथ योजनेच्या आडून करीत आहे. ही योजना राष्ट्रहित व देशाच्या सुरक्षेला बाधक आहे.  सध्या या योजनेविरोधात विविध राज्यांत होणार्‍या हिंसक आंदोलनाला आमचा विरोध आहे.

कंत्राटी भरतीमुळे चार वषार्र्र्ंनंतर तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचे काम सरकार करणार आहे. एकूण भरती करून घेतलेल्या तरुणांपैकी फक्त 25 टक्के तरुणांना पुढील सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. उर्वरित 75 टक्के तरुणांना चार वर्षांनंतर निवृत्ती देणार असल्याने कमी वयातच प्रचंड बेकार तरुण निर्माण होतील आणि ऐन तारुण्यामध्ये प्रचंड मोठे नैराश्य यामुळे येईल. ही योजना मागे घेण्याच्या मागणीसाठी डीवायएफआयतर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. यानुसार आंदोलन करण्यात येणार आहे, असे कलेटवाड म्हणाले.

पत्रकार परिषदेला राज्य अध्यक्ष नंदू हाडळ, जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, सचिव अनिल वासम, कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, दत्ता चव्हाण, अशोक बल्ला उपस्थित होते.

Back to top button