‘सावंतवाडी-दोडामार्ग वन्यजीव कॉरिडोर’ इको सेन्सिटिव्हमधून वगळा! | पुढारी

‘सावंतवाडी-दोडामार्ग वन्यजीव कॉरिडोर’ इको सेन्सिटिव्हमधून वगळा!

सावंतवाडी : प्रतिनिधी 

जैवसमृद्ध, अनेक दुर्मीळ प्रजातींचे अधिवासस्थान तसेच पट्टेरी वाघाचे भ्रमणक्षेत्र अशी ओळख असणारा ‘सावंतवाडी-दोडामार्ग वन्यजीव कॉरिडोर’ इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यात यावा, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे केली आहे.गेल्या महिन्यात याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा कॉरिडोर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात खनिज प्रकल्प प्रस्तावित असल्याने मायनिंग लॉबी हा कॉरिडोर इको झोन घोषित होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहे. सावंतवाडी-दोडामार्ग वन्यजीव कॉरिडोरसह कोकणातील 358 गावे इको झोनमधून वगळण्याची शिफारसही राज्य शासनाने केली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील आंबोली व दोडामार्ग तालुक्यातील मांगेली दरम्यान असलेला 35 स्क्वे.कि.मी चा हा कॉरिडोर प.घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात अंतर्भूत होतो. महाराष्ट्रातील राधानगरी, कोयना, चांदोली या अभयारण्यांना कर्नाटकातील भीमगड अभयारण्याशी जोडणारा हा कॉरिडोर रानटी हत्तींसह अनेक दुर्मीळ वन्यजीवांचा भ्रमणमार्ग आहे. 35 स्क्वे.कि.मी च्या या कॉरिडोरमध्ये 318 जातीच्या वनस्पती,वनौषधी, वन्यजीवांच्या 18 प्रजातीत पट्टेरी वाघ, बिबटे, अस्वले, गवे यासह अनेक दुर्मीळ प्राणी तसेच 13 विविध जातींचे पक्षी यांनी हा कॉरिडोर जैवसमृद्ध बनला आहे. वनविभाग, शासकीय न निमशासकीय संस्थानी केलेल्या संशोधन अहवालात या कॉरिडोरची जैवसंपदा समोर आली आहे. हा कॉरिडोर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्याची मागणी वनशक्‍ती व आवाज फाउंडेशन या संस्थानी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
 

Back to top button