‘एपीएमसी’ व्यापार्‍यांचा खारघरला जाण्यास विरोध | पुढारी

'एपीएमसी' व्यापार्‍यांचा खारघरला जाण्यास विरोध

नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई एपीएमसीच्या भाजी मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय राज्य सरकारकडून दिले जात आहे. पहिला पर्याय होता,तो म्हणजे केवळ खरेदीदारांना प्रवेश देणे. दुसरा पर्याय पत्र दिलेल्या वाहनांना प्रवेश किंवा व्यापार्‍यांनी मागवलेल्या शेतकर्‍यांच्या माल प्रवेश. या उपाययोजना केल्याने गर्दी कमी झाली आहे. सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत केवळ 52 गाड्यांची आवक झाली. असे असताना व्यापार्‍यांशी कुठलीही चर्चा न करता खारघर सेंट्रल पार्कच्या बाजूला असलेल्या भूखंडावर मार्केट स्थलांतर करण्याची तयारी केली जात आहे. याला एपीएमसी व्यापार्‍यांनी विरोध केला असून एपीएमसीतच व्यापार करू असा निर्णय घेतला आहे. 

मार्केट तात्पुरत्या स्वरूपात खारघरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तरी व्यापारी व इतर कुठल्याही घटकांशी प्रशासनाने चर्चा केली नाही, अशी माहिती संचालक व घाऊक व्यापारी संजय पिंगळे यांनी ‘दै.पुढारी’शी बोलताना दिली. 

सिडकोने यासाठी जवळपास ५० एकर भूखंड उपलब्ध करून दिला आहे. एक हजार चौरस फुटाचे जवळ १२०० ते १३०० गाळे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र ही तयारी केवळ गर्दी कमी करण्यासाठी आहे. आता एपीएमसी प्रशासनाने खरेदीदारांनाच ८०० जणांना परवानगी दिली आहे. त्यात ज्या शेतक-यांकडून माल मागवला आहे. त्याचे पत्र, गाडी नंबर एपीएमसीला दिला जात असल्याने ठराविक गाड्यांची आवक होत आहे. सोमवारी ५२ गाड्यांची आवक झाली. खरेदीदारांची संख्या घटली. यामुळे साहजिकच प्रत्येक विंगमधील गर्दी कमी झाली आणि ठराविक अंतरावर उभे राहून माल खरेदी केला जातो. एपीएमसी गाळे, कामगार आणि इतर सुविधा आहेत. त्या सोडून खारघरला काय करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.  व्यापार्‍यांचा त्याला विरोध असल्याचे सांगितले.     

मुंबई, नवी मुंबई परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. भाजी मार्केटमधील होणारी गर्दी पहाता, कोरोनाचा प्रसार होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजना कमी पडू लागल्या आहेत. पुढील दोन दिवसात गर्दी कमी न झाल्यास भाजी मार्केट खारघरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, सिडको व बाजार समिती प्रशासनाला त्याविषयी सूचना केल्या आहेत. सिडकोने तत्काळ खारघर सेक्टर २८, २९ मधील भूखंड तात्पुरत्या स्वरूपात भाजी मार्केट स्थलांतर करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. भुखंडाची साफसफाई करून तेथे भाजी मार्केट उभारण्याचे काम सुरू आहे.

भाजी मार्केटमध्ये ९७६ गाळे असून विस्तारीत मार्केटमध्ये २८५ गाळे आहेत. हे गाळे २०० चौरस फूटाचे असून एकाला एक लागून आहेत. यामुळे मार्केटमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. खारघरमध्ये मुळ मार्केटच्या पाच पट मोठ्या आकाराचे गाळे तयार केले जाणार आहेत.

एसटी डेपोच्या भूखंडाचा वापर

बाजार समितीच्या फळ मार्केटला लागून एसटी डेपोचा भूखंड मोकळा आहे. त्या भुंखंडाची ही साफसफाई करण्यात आली आहे. त्या भूखंडावर टोमॅटो व्यापाऱ्यांना स्थलांतर करण्याचा विचार सुरू आहे.

Back to top button