इम्रान यांचे चार विवाह, शाहबाज एक पाऊल पुढे! पाचवेळा बोहल्यावर | पुढारी

इम्रान यांचे चार विवाह, शाहबाज एक पाऊल पुढे! पाचवेळा बोहल्यावर

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सीता व्हाईट, विद्यमान पत्नी बुशरा, माजी पत्नी जेमिमा, माजी पत्नी रेहम अशा 4 बायका झाल्या. पाकिस्तानचे भावी पंतप्रधान शाहबाज शरीफ अशा बाबतीत इम्रान खान यांच्या एक पाऊल पुढेच आहेत. शाहबाज शरीफ यांचे पाच विवाह झाले आहेत.

इम्रान यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले तेव्हा एकूण 342 पैकी 174 खासदार उपस्थित होते. सर्वांनी इम्रानविरुद्ध मत दिले आणि पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाची सद्दी संपली. पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ नवे पंतप्रधान असतील. सन 2018 मध्ये शहबाज यांचे ज्येष्ठ बंधू नवाज शरीफ यांना पदासाठी अपात्र ठरविण्यात आल्यानंतर शाहबाज शरीफ यांच्याकडे पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज) अध्यक्षपद आले होते. शाहबाज तीनवेळा पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते.

शाहबाज यांचे 5 विवाह झाले. पहिली पत्नी बेगम नुसरत यांच्यापासून शाहबाज यांना 5 अपत्ये आहेत. पुढे नुसरत 1993 मध्ये मरण पावल्या. नंतर शाहबाज यांनी दुसरे लग्न केले. नर्गिस खोसा या त्यांच्या दुसर्‍या पत्नी. शाहबाज यांनी सौदी अरेबियामध्ये आलिया हनी हिच्याशीही लग्न केले. आलियाला वाहतुकीत खोळंब्याचा त्रास नको म्हणून खास तिच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यावर त्यांनी पूल बांधून घेतला होता, त्याची मोठी चर्चा असते. पुढे शाहबाज यांनी आलियाला तलाक दिला. आलियापासून शाहबाज यांना खदिजा नावाची कन्या आहे.

सन 2003 मध्ये दुबई येथे तहमीना दुर्रानी हिच्याशी एका खासगी समारंभात शाहबाज यांनी लग्न लावले. तहमीना सध्या लाहोरला राहातात. तहमीना यांनी ‘माय फ्युडल लॉर्ड’ ही आत्मकथा लिहिली. त्यात हे सगळे आले आहे. सन 2012 मध्ये शाहबाज यांनी पंजाबात पोलिस अधिकारी असलेल्या एका महिलेशी लग्न केले. या पाचव्या बायकोचे नाव कुलसूम असल्याचे सांगण्यात येते. कुलसूम यांना पहिल्या लग्नापासून 3 मुले आहेत. शाहबाज यांच्या कुटुंबाने हे लग्न ना स्वीकारले, ना त्याला दुजोरा दिला.

Back to top button