नाथषष्ठी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार : संदीपान भूमरे | पुढारी

नाथषष्ठी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार : संदीपान भूमरे

पैठण; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यापासून पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रा महोत्सव होणार का नाही याविषयी वेगवेगळ्या अफवा निर्माण झाल्या होत्या. यामुळे राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा नाथ संस्थान मंडळाचे अध्यक्ष संदिपान भुमरे यांनी विशेष बैठक घेऊन नाथषष्ठी साजरी होणार अशी घोषणा शनिवारी प्रशासन व नागरिकांच्या उपस्थितीत केली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, तहसीलदार दत्तात्रय निलावाड, नगर परिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर दोन वर्षापासून संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रा महोत्सव खंडित करण्यात आला होता. सद्यस्थितीत कोरोना साथीच्या रुग्ण बाधित नसल्यामुळे दि. २० ते २३ मार्च दरम्यान नाथषष्ठी यात्रेसाठी महाराष्ट्रातून हजारो पायी दिंडी घेऊन भाविक पैठण नगरीकडे निघाले आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यात्रा भरणार असल्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिली होती.

यानंतर शनिवार रोजी सकाळी १० वाजता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा नाथ मंदिर संस्थांचे अध्यक्ष संदीपान भुमरे यांनी स्थानिक प्रशासनाच्या प्रमुख अधिकारी व नागरिकांची बैठक घेऊन यात्रा नियोजन करणे संदर्भात आदेश देऊन यात्रा होणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी नाथमंदिर संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, जिल्हा दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता कल्याण रंधे, उपअभियंता रोहित तायडे, प्रपाठक डॉ. भारत चव्हाण, पाटबंधारे विभागाचे गणेश कराडकर, डी. आर. शिरसाट, बी. वाय. अंधारे, सा.बाचे भारत लांडगे, नाथवंशज ह.भ.प योगेश महाराज पालखीवाले, परिवहन महामंडळाचे मॅनेजर सुहास तरवडे, गणेश मडके, नामदेव खरात, सोमनाथ परदेशी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया, दिनेश पारीक, राजेंद्र मापारी, दीपक मोरे, शेखर शिंदे, प्रशांत जगदाळे यांच्यासह नाथभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button