मडगाव : वेगळेपण दर्शवणारा मळकर्णेचा ‘शेणी उजो’ उत्सव | पुढारी

मडगाव : वेगळेपण दर्शवणारा मळकर्णेचा ‘शेणी उजो’ उत्सव

मडगाव : रविना कुरतरकर
संपूर्ण गोव्यात रंगाची होळी साजरी केली जाते. पण, सांगेचा मळकर्णे भाग होळीच्या उत्सवाला अपवाद ठरला आहे. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आजही या गावाचे वेगळेपण जपून आहेत. मळकर्णे होळीच्या पूर्वसंध्येला गुलालाने नव्हे तर चक्क आगीने होळी खेळली जाते. अतिशय जुन्या आणि पारंपरिक पद्धतीला, हा प्रकार ‘शेणी उजो’ म्हणून प्रख्यात आहे.

मळकर्णेचा प्रसिद्ध शेणी उजो उत्सव गुरुवारी मध्यरात्री पार पडला. हातात सुक्या गोवरांना आग लावून झाडाच्या फांदीच्या साहाय्याने ती आग आपल्या अंगावर घेण्याची अत्यंत जुनी परंपरा आजही लोक पळत आहेत. प्रसिद्ध शेणी उजो पाहण्यासाठी मडगाव, पणजी, वास्को, आदी शहारतून मोठ्या प्रमाणात लोक भेट देत आहे. गुरुवारी हजारो लोकांच्या उपस्थितीत मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारात पार पडला आहे. दर वर्षी शिगम्याच्या दिवसांत आणि पौर्णिमेच्या रात्री शेणी उजो साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे, यंदाही वृद्ध आणि तरुणांपासून लहान मुलांनीदेखील उत्सवात सहभाग घेतला होता. गावातील लोकांशी चर्चा केली असता, या उत्सवाची परंपरा, बर्‍याच वर्षापासून चालत आलेली आहे, असे त्यांनी सांगितले. राजेश गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेणी उजो उत्सवात सहभागी होण्याकरिता गावातील लोक, पंधरा दिवस अगोदरपासून शाकाहार पाळतात. या काळात गावात, तसेच मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी केल्या जातात. पूर्णपणे शाकाहारी राहिलेलेच लोकच शेणी उजोत सहभागी होऊ शकतात. अंगावर आग घेण्याचा उत्सव रात्र भर चालतो. या गावात तीन होळ्यांची परंपरा आहे. या तीनही होळ्या एकत्रित करून, मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. शेणी उजोसाठी गुरांचे शेण सुखवले जाते, हो…स्सय हो…स्सयच्या गजरात सुक्या शेणाला लावलेली आग अंगावर घेतली जाते. या कळशातून अनवाणी पायाने लोक चालत जातात.

अशीही अनोखी प्रथा

रानडुकराचे रक्‍त होळीच्या ठिकाणी शिंपडण्याची येथे प्रथा आहे. गावात या उत्सवादरम्यान रानडुकराची शिकार झाली तर तो रानडुकर उत्सवाच्या ठिकाणी आणावा लागतो आणि त्याचा प्रसाद म्हणून त्याचे मटण गावकर्‍यांना खावे लागते. पण दरवर्षी, रानडुक्कर मारला जातो, असेच नाही. अशा वेळी शाकाहारी राहून गावकरी उत्सवात सहभागी होतात. रानडुकराचे मांस सोडून अन्य कोणताही मांसाहार पदार्थ गावकर्‍यांना खाता येत नाही. रानडुक्कर खाऊन अग्नी कुंडातून चालण्यास गावकर्‍यांना मुभा आहे, अशी माहिती गावकर्‍यांनी दिली आहे.

Back to top button