एमआयएमची महाविकास आघाडीसोबत युती होऊ शकत नाही : संजय राऊत | पुढारी

एमआयएमची महाविकास आघाडीसोबत युती होऊ शकत नाही : संजय राऊत

मुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्रात ३ पक्षांचचं सरकार राहील. एमआयएमची भाजपशी छुपी युती आहे. औरंगजेब ज्याचा आदर्श आहे, अशा लोकांची आमची हातमिळवणी होऊ शकत नाही. औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे शिवसेनेसोबत येऊ शकत नाहीत. छत्रपतींच्या विचाराने आमचं सरकार काम करतं, असे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भेटीनंतर चर्चेला उधाण

एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये युतीच्या मुद्यावर बैठक झाल्यानंतर चर्चेला उधाण आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) आणि राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यात ही भेट झाली आहे.

जलील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. दोन दिवसांपूर्वी टोपे यांनी जलील यांच्याघरी जाऊन त्यांची बैठक घेतली. यावेळी राजकीय चर्चा सुद्धा झाली. तर प्रत्येकवेळी आम्हाला भाजपची बी टीम म्हणतात मग राष्ट्रवादीसोबत आम्ही युती तयार करायला असल्याची ऑफर आम्ही त्यांना दिली असल्याचं जलील म्हणाले होते.

जलील म्हणाले, मुळात एमआयएमला सोबत घेणे कुणालाच नकोय. पण मुस्लिम मते सर्वांना पाहिजेत. त्यामुळे काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनीही यावे आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा युती करायला तयार आहोत. आज घडीला देशाच सर्वात मोठे नुकसान जर कुणी करत असेल तर ते भाजप आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी जे काय करावे लागेल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत असेही जलील म्हणाले.

Back to top button