CSK vs LSG : चेन्नईचे लखनौला 211 धावांचे आव्हान | पुढारी

CSK vs LSG : चेन्नईचे लखनौला 211 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमिअर लीग 2024 मध्ये ऋतुराज गायकवाड याने खणखणीत शतक झळकावले. चेन्नई सुपर किंग्जसाठी कर्णधार म्हणून शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याला शिवम दुबेची दमदार साथ मिळाली आणि दोघांनी लखनौ जायंटस्ची सुपर धुलाई केली.

लखनौने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजी दिली. अजिंक्य रहाणे (1) व डॅरिल मिशेल (11) या दोन खेळाडूंना 49 धावांवर माघारी पाठवताना लखनौच्या के. एल. राहुल व दीपक हुडा यांनी अद्भुत झेल घेतले; पण त्यांच्या या मेहनतीवर चेन्नईचा कर्णधार ऋतुराजने पाणी फिरवले. रवींद्र जडेजा 19 चेंडूंत 16 धावांवर झेलबाद झाला. ऋतुराज दमदार फटकेबाजी करत होता. ऋतुराजला रोखणे लखनौला अवघड होऊन बसले होते. ‘सीएसके’साठी सलामीवीर म्हणून 2,000 हून अधिक धावा करणारा ऋतुराज पहिला फलंदाज ठरला. शिवम दुबने 16 व्या षटकात सलग 3 उत्तुंग षटकार खेचून ऋतुराजसह 24 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ऋतुराजने पुढच्या षटकाची सुरुवात षटकाराने केली.

ऋतुराजने 56 चेंडूंत शतक पूर्ण केले आणि त्यात 11 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. सुरेश रैना, शेन वॉटसन व मुरली विजय यांच्यानंतर चेन्नईसाठी दोन शतके झळकावणारा तो चौथा फलंदाज ठरला. ऋतुराजचे हे टी-20 तील सहावे शतक ठरले आणि त्याने के. एल. राहुलच्या विक्रमाशी बरोबरी केली. सूर्यकुमार यादव व शुभमन गिल (5) यांना त्याने मागे टाकले. दुसर्‍या बाजूने शिवमनेही 22 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तो 27 चेंडूंत 3 चौकार व 7 षटकारांसह 66 धावांवर रन आऊट झाला. ऋतुराज 60 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकारांसह 108 धावांवर नाबाद राहिला. धोनीने 1 चेंडूंत चार धावा करून चेन्नईला 4 बाद 210 धावांपर्यंत पोहोचवले.

(CSK vs LSG)

हेही वाचा :

Back to top button