RR vs KKR : कोलकाताविरूद्ध राजस्थानचा ‘रॉयल’ विजय; बटलरची शतकी खेळी | पुढारी

RR vs KKR : कोलकाताविरूद्ध राजस्थानचा 'रॉयल' विजय; बटलरची शतकी खेळी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाताना दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉस बटलरने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने सामन्यात दोन गडी राखून विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 6 गडी गमावून 223 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 20 षटकांत आठ गडी गमावून 224 धावा करत दोन विकेट्सने सामन्यात विजय मिळवला. (RR vs KKR)

कोलकाताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने डावाला संथ सुरूवात केली. संघाला पहिला झटका यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला त्याने आपल्या खेळीत19 धावा केल्या. यानंतर संजू सॅमसन आणि जोस बटलर यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी झाली. संजू केवळ 2 धावा करून तंबूत परतला. यानंतर रियान परागने चार चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 34 धावांची खेळी केली. सामन्यात राजस्थानची फलंदाजीची फळी कोलकात्याच्या गोलंदाजीसमोर झुंजताना दिसली. ध्रुव जुरेलने दोन, रविचंद्रन अश्विनने आठ, शिमरॉन हेटमायर शून्य, रोव्हमन पॉवेलने 26 आणि ट्रेंट बोल्टने शून्य धावा केल्या.

बटलरने कोलकाताचा विजय हिसकावला

डावाच्या 19व्या षटकात जोस बटलरने राजस्थानच्या बाजूने सामना फिरवला. हर्षित राणाच्या शेवटच्या षटकात त्याने 19 धावा कुटल्या. यादरम्यान बटलरने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. त्याने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. आयपीएल 2024 मधील त्याचे हे दुसरे शतक आहे. यापूर्वी बटलरने बंगळुरूविरुद्ध दमदार शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात बटलरने 60 चेंडूंत 107 धावा करून नाबाद राहिला. आपल्या खेळीत त्याने नऊ चौकार आणि सहा षटकार लगावले. गोलंदाजीमध्ये कोलकाताकडून हर्शित राणा, सुनिल नरेन आणि वरून चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर वैभव अरोराने एक विकेट घेतली. (RR vs KKR)

बटलरच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

सामन्यात शतक झळकावून बटलर ख्रिस गेलला मागे टाकत आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला. बटलरने आयपीएलमध्ये सात शतके ठोकली आहेत तर गेलने आयपीएलमध्ये सहा शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर विराट कोहली आठ शतकांसह अव्वल स्थानावर कायम आहे. (RR vs KKR)

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने सुनील नरेनच्या राजस्थानविरुद्धच्या झंझावाती खेळीमुळे 20 षटकांत 6 बाद 223 धावा केल्या. या सामन्यात केकेआरची सुरुवात खराब झाली. फलंदाजीला सलामीला आलेला फिल सॉल्ट केवळ 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आवेश खानने त्याला बाद केले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आंग्रश रघुवंशीने नरेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. यामध्ये रघुवंशीने राजस्थानविरुद्ध पाच चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. या सामन्यात श्रेयस अय्यरने 11, आंद्रे रसेलने 13 धावा आणि व्यंकटेश अय्यरने आठ धावांचे योगदान दिले.

सुनील नरेनने या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याचे आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. त्याने 56 चेंडूंत 13 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. 18व्या षटकात ट्रेंट बोल्टने त्याला क्लीन बोल्ड केलेझ. या सामन्यात रिंकू सिंग 20 धावा तर रमणदीप सिंग एक धावावर नाबाद राहिला. राजस्थानकडून आवेश खान आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी दोन तर ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (RR vs KKR)

हेही वाचा : 

Back to top button