हिंगोली : कनेरगावनाका तपासणी नाक्यावर जीपमधून 15 लाखांची रोकड जप्त | पुढारी

हिंगोली : कनेरगावनाका तपासणी नाक्यावर जीपमधून 15 लाखांची रोकड जप्त

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते वाशीम मार्गावर कनेरगावनाका तपासणी नाक्यावर तपासणी पथकाने एका जीपमधून १५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी संबंधितांना १९ एप्रील रोजी नांदेड येथील आयकर कार्यालयात हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

हिंगोली लोकसभा मतदार संघाची निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. निवडणुक काळात अवैधरित्या दारु, रोकड यांची वाहतुक होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी हिंगोली जिल्हयात येणाऱ्या सर्व मार्गाच्या सिमेवर तपासणी नाके उभारण्यात आले असून जिल्हयातील अंतर्गत रस्त्यावरही तपासणी नाके उभारले आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या तसेच जिल्हयात येणाऱ्या सर्वच वाहनांची तपासणी केली जात आहे.

हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत कनेरगावनाका, येलदरी, वाढोणा या ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांसह महसुल व इतर विभागाचे कर्मचारी २४ तास कर्तव्यावर नियुक्त केले आहेत. या शिवाय उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या कडून तपासणी नाक्यांना भेटी दिल्या जात आहेत.

दरम्यान, कनेरगावनाका येथील तपासणी नाक्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास एक क्रूझर जीप थांबविण्यात आली. त्या ठिकाणी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीपची तपासणी केली असता त्यात १५ लाखांची रोकड आढळून आली. जीपमधील व्यक्तींना या रकमेबाबत उत्तरे देता आली नसल्याने सदर रक्कम जप्त करून कोषागार कार्यालयात ठेवली आहे. त्यानंतर उपविभागीय अधिकारी पारधी, नोडल अधिकारी अरविंद मुंडे यांनी या संदर्भात तातडीने निवडणुक विभाग व नांदेडच्या आयकर विभागाला माहिती दिली आहे. त्यानंतर आता आयकर विभागाने संबंधित व्यक्तींना १९ रोजी नांदेड येथील आयकर कार्यालयात हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Back to top button