Jalgaon News | बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी नियोजन करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कृषी विभागाला सूचना | पुढारी

Jalgaon News | बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी नियोजन करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कृषी विभागाला सूचना

जळगांव- खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यासोबतच जमिनीचा पोत वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने जनजागृतीवर भर देणे गरजेचे आहे. त्या साठी आवश्यक त्या उपाय योजना करणे गरजेचे असून जिल्हा बँक व राष्ट्रीय बँकानी किसान क्रेडिट कार्ड धारकांची संख्या वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप पूर्व हंगम बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, प्रकल्प संचालक (आत्मा) रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रवण कुमार झा, नाबार्ड चे व्यवस्थापक श्रीकांत झांबरे आदी. यावेळी उपस्थित होते.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका निहाय पिकांचे सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे असून शेत जमीन तयार करण्यापासून बीज रोपण प्रक्रिया पर्यंत रासायनिक खतांचा जमिनीत कमीत कमी वापर करून सेंद्रिय खते, ग्रीन म्यॅन्युअरिंग, जैविक खतेयांचा वापर करून खर्च कमी करण्यावर भर देण्यात यावा. शेतकऱ्यांचे राहणीमान कशाप्रकारे सुधारेल याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या सूक्ष्म उपायोजना राबवण्याचे आवश्यकता असल्याचे सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या बैठकीत दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी संगणकीय प्रणालीद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. खरीप हंगाम 2024 25 साठी कापूस व सोयाबीन वगळता 9 लाख 68 हजार 605 हेक्टर साठी 18 हजार 438 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात पाच लाख 58 हजार 392 हेक्टर साठी 27 लाख 92 हजार बीटी बियाण्यांच्या पाकिटांची मागणी नोंदवली आहे. खरीप हंगामासाठी तीन लाख 40 हजार टन खतांची मागणी करण्यात आली आहे. यापैकी तीन लाख 23 हजार टन खतांचे व 73 हजार 299 नॅनो युरियाचे आवर्तन कृषी आयुक्तालयाकडून जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे.

जिल्ह्यात बोगस बियाणे व खतांची अधिक दराने विक्री होऊ नये यासाठी व विक्री होणाऱ्या बियाण्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी सोळा भरारी पथके नियुक्त करण्यात आले असून 42 निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यासोबतच फळबाग लागवड योजना, पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 3582 हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड होणार असल्याची माहिती श्री.तडवी यांनी यावेळी दिली. सन 2024-25 मध्ये सात लाख 44 हजार 593 हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून त्यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी उपयोग करावा असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचे ई-केवायसी झालेले नाहीत त्याबाबत देखील तात्काळ कार्यवाही पूर्ण करण्यात यावी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र धारकांनी शासनाने ठरवून दिलेल्या किमतीनुसारच रासायनिक खतांची व बियाण्यांची विक्री करावी. अनावश्यक जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या. त्यासोबतच एचटीबीटी कपाशी वाणांची विक्री होणार नाही. याची दक्षता घेण्यासंदर्भातील सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.

जळगाव जिल्ह्यात पाच लाख 58 हजार 392 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कापूस पिकाला पर्याय म्हणून मका पिकाची लागवड करण्याबाबत जनजागृती करावी.या वर्षाचे पर्जन्यमानाचे अनुकूल परिस्थितीलक्षात घेऊन कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत. व्हर्मी कंपोस्ट, वैयक्तिक शेततळे, जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत, पावसाच्या खंडित कालावधीत ठिबक सिंचनाद्वारे साठवणूक केलेल्या पाण्याचा उपयोग करावा असे आवाहन देखील या बैठकीत करण्यात आले.

हेही वाचा –

Back to top button