कर्णधारपदाचे दडपण जाणवले नाही : ऋतुराज गायकवाड | पुढारी

कर्णधारपदाचे दडपण जाणवले नाही : ऋतुराज गायकवाड

चेन्नई, वृत्तसंस्था : चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल 2024 मधील पहिली मॅच एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झाली. या सामन्यात ऋतुराज गायकवाड चेन्नईचे नेतृत्व करत होता. त्याने पहिल्या सामन्यात चेन्नईला 6 विकेटस्नी विजय मिळवून दिला. हा विजय ऋतुराजसाठी स्पेशल असा ठरणार आहे. या विजयानंतर नेतृत्वाबद्दल विचारले असता ऋतुराज म्हणाला, मी नेहमीच आनंद घेतला आहे. कधीच अतिरिक्त दबाव घेतला नाही. कर्णधारपदाचा अनुभव कसा असतो हे याआधी हाताळले आहे. मी कधीच दबाव घेतला नाही. बाकी माझ्याकडे माहीभाई देखील आहेच.

चेपॉकवर झालेल्या सामन्यात बंगळुरूने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि चेन्नईसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य दिले. चेन्नईने विजयाचे लक्ष्य 18.4 षटकांत आणि 4 विकेटस्च्या मोबदल्यात पार केले. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात विजय मिळवल्याचा आनंद ऋतुराजच्या चेहर्‍यावर दिसत होता. मॅच झाल्यानंतर तो म्हणाला, काही 2-3 ओव्हर बाजूला केले तर संपूर्ण नियंत्रण होते. अजून 10 ते 15 धावा कमी असत्या तर छान झाले असते, पण त्यांनी अखेरच्या षटकांत चांगली फलंदाजी केली. फाफ आणि मॅक्सवेल यांना बाद करणे हा महत्त्वाचा क्षण ठरला. आम्हाला लवकर 3 विकेटस् मिळाल्या ज्यामुळे काही षटके नियंत्रण मिळवू शकलो.

अजिंक्यचे कौतुक

ऋतुराज गायकवाडने संघातील अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचे कौतुक केले. मला वाटते की, आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू हा नैसर्गिक स्ट्रोक प्लेअर आहे. माझ्या मते अज्जूभाई (अजिंक्य) फार सकारात्मक खेळतोय. प्रत्येकाला त्याची जबाबदारी माहिती आहे. कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचे आहे आणि कोणाला नाही. आपल्याला नेमके काय करायचे आहे ही गोष्ट माहीत असली की गोष्टी सोप्या होतात. अजून 2-3 गोष्टींवर काम करायचे आहे. सर्वांनी चांगली फलंदाजी केली.

Back to top button