Badminton Asia Team Championships : भारतीय महिला संघाने बॅडमिंटनमध्ये इतिहास घडला | पुढारी

Badminton Asia Team Championships : भारतीय महिला संघाने बॅडमिंटनमध्ये इतिहास घडला

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय महिला बॅडमिंटन संघाने रविवारी मलेशियातील सेलंगोर येथे झालेल्या चुरशीच्या फायनलमध्ये थायलंडचा 3-2 असा पराभव करून बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप (Badminton Asia Team Championships) स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. बॅडमिंटनच्या इतिहासात भारताने प्रतिष्ठित एशिया टीम चॅम्पियनशिप जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पी. व्ही. सिंधू, गायत्री गोपीचंद-तृषा जॉली आणि युवा अनमोल खारब यांनी आपापल्या लढती जिंकल्या.

महिला बॅडमिंटनमधील भारताची सर्वोच्च एकेरी रँकिंग असलेल्या पी. व्ही. सिंधूने काटेथोंगवर सरळ गेममध्ये विजय मिळवून स्वप्नवत सुरुवात केली होती. भारताची स्टार दुहेरी जोडी तेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवत भारताला आशिया टीम चॅम्पियनशिप फायनलमध्ये 2-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली;

मात्र भारताच्या अश्मिता चाहिलाने एकेरीचा दुसरा सामना आणि प्रिया कोन्जेंगबम आणि श्रुती मिश्रा यांनी दुहेरीचा दुसरा सामना गमवाला. त्यामुळे मलेशियाने 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर भारताच्या 17 वर्षांच्या अनमोल खारबने चोइकीवोंगला पराभूत करत भारताला विजेतेपद पटकावून दिले.

पहिल्या सामन्यात दुखापतीतून पुनरागमन करून आपली पहिलीच स्पर्धा खेळणार्‍या पी. व्ही. सिंधूने अवघ्या 39 मिनिटांत सुपनिंदा काटेथोंगचा 21-12, 21-12 असा पराभव करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. गायत्री गोपीचंद आणि जॉली तृषा यांनी जोंगकोलफाम कितिथाराकुल आणि रविंदा प्रजोंगजल यांना तीन गेमच्या चुरशीच्या लढतीत पराभूत केल्याने भारत 2-0 ने पुढे गेला. गायत्री आणि जॉली यांनी आपला उत्साह कायम ठेवला आणि अंतिम गेममध्ये 6-11 ने पिछाडीवरून पुनरागमन करत 5 सामन्यांच्या पहिल्या दुहेरी सामन्यात थाई जोडीचा 21-16, 18-21, 21-16 असा पराभव केला.

गोपीचंदकडून अनमोलचे कौतुक (Badminton Asia Team Championships)

या स्पर्धेत चमक दाखवणार्‍या अनमोल खारब या युवा बॅडमिंटनपटूचे दिग्गज प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी कौतुक केले आहे. ती ज्याप्रकारे खेळते त्यावरून ती भारतीय बॅडमिंटनचे भविष्य आहे, असे गोपीचंद यांनी रमहटले आहे.

Back to top button