जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत दुसर्‍या स्थानी | पुढारी

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत दुसर्‍या स्थानी

दुबई, वृत्तसंस्था : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकला. रविवारी राजकोटमध्ये त्यांनी पाहुण्या संघाचा 434 धावांनी पराभव केला. कसोटी इतिहासातील धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2021 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव केला होता. या मोठ्या विजयासह टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे.

इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी जिंकल्यानंतर भारताचे सात सामन्यांतून 50 गुण झाले आहेत. भारताची गुणांची टक्केवारी 59.52 वर पोहोचली आहे. भारताने 55 टक्के गुण मिळविणार्‍या ऑस्ट्रेलियन संघाला मागे टाकले. भारत आता गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे.

न्यूझीलंड अव्वल स्थानावर कायम

दक्षिण आफ्रिकेवरील दुसर्‍या कसोटीतील विजयानंतर न्यूझीलंड संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी 75.00 आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले असून, तीन सामने जिंकले आहेत. एका सामन्यात पराभव झाला आहे. 2023-25 च्या मोसमात ऑस्ट्रेलियाने 10 कसोटी सामने खेळले आहेत आणि सहा जिंकले आहेत. कांगारूंना तीनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने सात कसोटी सामने खेळले असून, चार जिंकले आहेत. टीम इंडियाने दोन सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.

Back to top button