अर्थसंकल्पाच्या भाषणात क्रीडापटूंचा गौरव | पुढारी

अर्थसंकल्पाच्या भाषणात क्रीडापटूंचा गौरव

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024 गुरुवारी संदसदेत सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी भारताने वेगवेगळ्या क्षेत्रांत केलेल्या दमदार कामगिरीचादेखील उल्लेख आपल्या भाषणात केला. त्यांनी भारताचा अव्वल बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदचादेखील उल्लेख आपल्या भाषणात केला. अर्थ मंत्रालयाने क्रीडा खात्याला भरभरून निधी दिल्याने देश या क्षेत्रात चौफेर प्रगती करीत असल्याचे त्यांनी यातून सूचित केले.

प्रज्ञानंदने 2023 मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणार्‍या मॅग्नस कार्लसनला कडवी टक्कर दिली होती. त्याचा उल्लेख सीतारामन यांनी आपल्या भाषणात केला. यातबरोबर त्यांनी मागच्या सरकारला टोला लगावत सांगितले की, भारताचे बुद्धिबळात 2010 पर्यंत भारताचे 20 ग्रँडमास्टर्स होते. आता भारतात जवळपास 80 ग्रँडमास्टर्स आहेत.

निर्मला सीतारामन आपल्या भाषणात म्हणाल्या, ‘आपले युवा क्रीडा क्षेत्रात नवनवी उंची गाठत आहेत. देशाला त्यांचा अभिमान आहे. आपण एशियन गेम्स आणि पॅरा गेम्स 2023 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकली. यावरून आपल्या देशाचा आत्मविश्वास दुणावल्याचे दिसून येते.

त्या पुढे म्हणाल्या की, बुद्धिबळाची 64 घरे गाजवणारा आपला नंबर एकचा खेळाडू प्रज्ञानंदने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला 2023 मध्ये चांगलेच अडचणीत आणले होते. भारतात 2010 मध्ये 20 ग्रँडस्लॅम होते, त्या तुलनेत आता 80 पेक्षा जास्त ग्रँडमास्टर्स आहेत.’ गेल्या महिन्यात 18 वर्षांच्या प्रज्ञानंदने चीनच्या लिरेनचा काळ्या मोहर्‍यांसह पराभव केला. त्याने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत दिग्गज विश्वनाथन आनंदला इंडियाच्या रँकिंगमध्ये मागे टाकले.

प्रज्ञानंदने वयाच्या 5 व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती. तो भारताचा सर्वात युवा आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला होता. त्याने 2018 मध्ये 12 व्या वर्षी ग्रँडमास्टरचा खिताब पटकावला होता.

भारताने गेल्या काही वर्षांत क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे. एशियन गेम्स आणि एशियन पॅरा गेम्समध्ये गेल्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक पदके गेम्समध्ये 111 पदके जिंकली होती. 2018 मध्ये भारताने 72 पदके जिंकली होती. हांगझू येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये भारताने रेकॉर्ड ब्रेक 107 पदके जिंकली. यात 28 सुवर्ण पदके, 38 रौप्य आणि 41 कांस्यपदकांचा समावेश होता.

Back to top button