हार्दिक पांड्या याला दक्षिण आफ्रिका दौर्‍यातही संधी मिळण्याची शक्यता कमी | पुढारी

हार्दिक पांड्या याला दक्षिण आफ्रिका दौर्‍यातही संधी मिळण्याची शक्यता कमी

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : टी-20 वर्ल्डकपमधील खराब कामगिरीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकलेल्या हार्दिक पांड्या याला दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठीही पुनरागमन करणे मुश्कील झाले आहे. त्याला निवडीपूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुमार कामगिरीनंतर हार्दिक पांड्या याला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून डच्चू दिला गेला. संपूर्ण टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पंड्याची निवड हाच भारतीय चाहत्यांचा चर्चेचा विषय ठरलेला. ‘आयपीएल-2021’च्या दुसर्‍या टप्प्यात एकही षटक न फेकणार्‍या व फलंदाजीतही फार कमाल न करू शकलेल्या हार्दिकची निवड का केली गेली, हा प्रश्न वर्ल्डकप स्पर्धे दरम्यान सर्वांना पडलेला.

अष्टपैलू म्हणून त्याचे संघातील स्थान जाणवलेच नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने चूक सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याची पहिली पायरी म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 व कसोटी मालिकेतून झालेली त्याची हकालपट्टी. आता त्याला दक्षिण आफ्रिका दौर्‍यातही संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने हार्दिकला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) जाऊन फिटनेस सिद्ध करण्याचे फर्मान सोडले आहे. ‘त्याचे दुखापतीतून सावरणे हे विश्रांतीवर अवलंबून आहे. त्याने लवकरच एनसीएमध्ये दाखल व्हावे आणि त्यानंतर त्याचा फिटनेस पाहून दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी त्याचा विचार करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल,’ असे बीसीसीआयच्या अधिकार्‍याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिकला बाकावर बसवून व्यंकटेश अय्यरची निवड केली गेली आहे. व्यंकटेशने किवींविरुद्ध गोलंदाजी केलेली नाही. फलंदाजीतही त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही. मात्र, पुढील टी-20 वर्ल्डकपचा विचार करून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांनी आतापासून संघ बांधणीवर भर दिला आहे. त्यामुळे व्यंकटेशला ते अधिकाधिक संधी देण्याच्या पक्षात आहेत.

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी टीम इंडियाची निवड न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर केली जाईल. त्याआधी हार्दिकला एनसीएमध्ये दाखल होऊन फिटनेस सिद्ध करावा लागेल. तो तंदुरुस्त झाल्यास 11 जानेवारी 2022 पासून सुरू होणार्‍या वन- डे व टी-20 मालिकेसाठी त्याचा विचार केला जाईल. त्याआधी हार्दिकला विजय हजारे ट्रॉफीत न खेळण्याचा सल्ला दिला गेला आहे, परंतु, हा निर्णय बीसीसीआयने हार्दिकवर सोडला आहे.

Back to top button