IND-W vs AUS-W : भारताचा ऑस्ट्रेलियावर 9 विकेटस्नी विजय | पुढारी

IND-W vs AUS-W : भारताचा ऑस्ट्रेलियावर 9 विकेटस्नी विजय

नवी मुंबई, वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघाने (IND-W vs AUS-W) शुक्रवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 9 विकेटस्नी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने प्रथम 141 धावा केल्या. भारताने हे आव्हान एका विकेटच्या मोबदल्यात 17.4 षटकांत पूर्ण केले. स्मृती मानधना (54) आणि शेफाली वर्मा (64) यांनी अर्धशतके झळकावत शतकी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील चार विकेट घेणारी युवा गोलंदाज तितस साधू हिला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

वन डे मालिकेतील 0-3 ने क्लीन स्विप मिळालेल्या भारतीय संघाचा या विजयाने आत्मविश्वास वाढणार आहे. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा फलंदाजीचे आमंत्रण दिले. लिचफिल्डने 49 धावा करूनही ऑस्ट्रेलियन संघ 20 षटकांत 141 धावा करू शकला.

भारतीय संघ फलंदाजीस उतरला तेव्हा मैदानावर दव पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कांगारू गोलंदाजांचे काम आणखी अवघड झाले. भारताची सलामी जोडी स्मृती मानधना (54) आणि शेफाली वर्मा (64) यांनी 134 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया घातला. स्मृती 16 व्या षटकात बाद झाली तेव्हा भारताचा विजय निश्चित झाला होता. 14 चेंडू शिल्लक असताना भारताचा विजय साकार झाला. मालिकेतील पुढील सामना रविवारी संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

तितस साधूने केल्या 4 शिकार (IND-W vs AUS-W)

19 वर्षीय राईट हँड मिडियम पेसर तितस साधूने पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. तिने आपल्या 4 षटकांत 4.25 च्या सरासरीने 17 धावा देत 4 विकेट घेतल्या. तितसच्या हल्ल्यात बेथ मूनी, ताहिला मॅकग्रा, अ‍ॅश्ले गार्डनर आणि अ‍ॅनाबेल सुदरलँड धारातीर्थी पडल्या. विशेष म्हणजे 2023 साली पदार्पण करणार्‍या तितसच्या पाच टी-20 सामन्यांत 8 विकेट झाल्या आहेत.

हेही वाचा…

Back to top button