IND vs NZ Semi Final : न्यूझीलंडसमोर भारताचे 398 धावांचे आव्हान | पुढारी

IND vs NZ Semi Final : न्यूझीलंडसमोर भारताचे 398 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांच्या जोरावर भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडला 398 धावांचे लक्ष्य दिले आहे. वानखेडे मैदानावर नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना संघाने 50 षटकांत 4 गडी गमावून 397 धावा केल्या. (IND vs NZ Semi Final)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने डावाची शानदार सुरुवात केली. प्रथम रोहितने वेगाने धावा केल्या आणि त्यानंतर गिलने आक्रमक फलंदाजी केली. रोहितने वर्ल्ड कपमध्ये 50 षटकार पूर्ण केले. सौदीच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा वैयक्तिक 47 धावांवर बाद झाला. पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने एक विकेटच्या नुकसानावर 84 धावा केल्या. गिल आणि कोहलीने भारताची धावसंख्या 150 धावांच्या पुढे नेली. यादरम्यान गिलने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 65 चेंडूत 79 धावा केल्यानंतर गिल रिटायर्ड हर्ट झाला.

यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली. त्याने 59 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान, तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने सचिनचा ६७३ धावांचा विक्रम मागे टाकला. विराट आणि श्रेयसने शतकी भागीदारी करत भारताची धावसंख्या 250 धावांच्या पुढे नेली.

विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील 50 वे शतक झळकावले आणि भारताची धावसंख्या 300 धावांच्या पुढे नेली. तो 117 धावा करून बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणखीनच आक्रमक झाला. राहुलच्या साथीने त्याने भारताची धावसंख्या 350 धावांच्या पुढे नेली. यानंतर श्रेयसने 67 चेंडूंत शतक पूर्ण केले आणि 70 चेंडूंत चार चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 105 धावा करून तो बाद झाला. 49व्या षटकात फलंदाजीला आलेला सूर्यकुमार एक धाव घेत बाद झाला. शेवटी लोकेश राहुलने शुभमन गिलच्या साथीने भारताचा डाव संपवला. राहुलने शेवटच्या षटकात शानदार फलंदाजी करत भारताची धावसंख्या 397 धावांपर्यंत नेली. 39 धावा करून तो नाबाद राहिला. तर शुभमन गिल 80 धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली.

हेही वाचा

Back to top button