IND vs NZ World Cup 2023 semi-final | प्रेशर को मारो गोली..! दबाव हाताळण्यास टीम इंडिया सक्षम : द्रविड | पुढारी

IND vs NZ World Cup 2023 semi-final | प्रेशर को मारो गोली..! दबाव हाताळण्यास टीम इंडिया सक्षम : द्रविड

बंगळूरु, वृत्तसंस्था : वन डे वर्ल्डकपमध्ये (IND vs NZ semi-final) भारत पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडसमोर आला आहे. उद्या (बुधवारी) होणार्‍या या लढतीत भारतावर थोडा दबाव असेल, असे बोलले जात आहे. कारण, ही नॉकआऊट मॅच आहे. मात्र, या लढतीबाबत कोच राहुल द्रविड दबावात नाहीत. स्पर्धेतील या लढतीतील दबाव कसा हाताळायचा हे संघाला माहिती असून ते संघाच्या विजयाबद्दल निश्चिंत आहेत. (IND vs NZ World Cup 2023 semi-final)

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दोन्ही संघांमधील ही लढत बुधवारी (15 नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. गेल्या काही आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता किवी संघाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विजयाची खात्री व्यक्त केली आहे.

भारतीय संघाने रविवारी (12 नोव्हेंबर) बंगळूरमध्ये झालेल्या नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात 160 धावांनी विजय मिळविला. या सामन्यानंतर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्टार स्पोर्टस् वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडचे संघ दुसर्‍यांदा भिडणार आहेत. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला, पण उभय संघांमध्ये दुसरी लढत ही उपांत्य फेरीत होत आहे. मात्र, या सामन्याबाबत आमचा द़ृष्टिकोन अजिबात बदलणार नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे की हा बाद फेरीचा सामना आहे आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात थोडे दडपण असेल. मात्र, ज्यापद्धतीने आम्ही आतापर्यंत हा दबाव हाताळला आहे आणि त्याला उत्तर दिले आहे ते पाहता आमचा आत्मविश्वास वाढेल. संघाच्या द़ृष्टिकोनात आणि तयारीत कोणताही बदल झालेला नाही.’

भूतकाळातील अनुभवांमधून शिकण्यावर भर (IND vs NZ World Cup 2023 semi-final)

आतापर्यंत भारतीय संघाने वेगवेगळ्या आयसीसी स्पर्धांमध्ये तीन वेळा न्यूझीलंडविरुद्ध बाद फेरीचे सामने खेळले आहेत आणि त्या सर्वांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच न्यूझीलंडविरुद्ध 2019 च्या उपांत्य फेरीतील पराभवाची आठवण करून देत द्रविड यांनी भूतकाळातील अनुभवांमधून शिकण्यावर भर दिला. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जेव्हा सगळे चांगले चाललेले असते तेव्हा सर्वांचे कौतुक होते. चाहते खेळाडूंना डोक्यावर घेतात, पण एका पराभवाने सगळेच गणित बिघडते. खेळाडूंवर सडकून टीकेला सामोरे जावे लागते. ऊटसूट सगळेजण तुम्हाला काही कळत नाही, असे टोमणे मारले जातात.’

श्रेयस अय्यर संघाचा कणा (IND vs NZ semi-final)

राहुल द्रविड यांनी नेदरलँडविरुद्ध चमकदार फलंदाजी करणार्‍या श्रेयस अय्यरचे कौतुक केले. अय्यरच्या कामगिरीबाबत ते म्हणाले की, श्रेयस हा आमच्या मधल्या फळीचा कणा आहे. गेल्या 10 वर्षांत चौथ्या क्रमांकावर चांगला खेळाडू शोधणे आमच्यासाठी खूप कठीण गेले आहे, हे सर्वांना माहीत आहे. श्रेयसने आपल्या खेळात सुधारणा करून आपली कुवत सिद्ध केली आहे. तो आता संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू बनला आहे यात शंका नाही.’

Back to top button