World Cup 2023 : रोहित शर्मा, दक्षिण आफ्रिकेची दमदार कामगिरी; जाणून घ्या नवे विक्रम | पुढारी

World Cup 2023 : रोहित शर्मा, दक्षिण आफ्रिकेची दमदार कामगिरी; जाणून घ्या नवे विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्डकप २०२३ मध्ये आत्तापर्यंत केवळ २० सामने झाले आहेत. मात्र, केवळ २० सामने झाले असतानाचं विश्वचषकातील अनेक जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, अॅडम मार्करम,  दक्षिण आफ्रिकेचा संघ विक्रम मोडित काढण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे अनेक विक्रम नव्याने लिहावे लागणार आहेत. जाणून घेऊयात आत्तापर्यंत कोणते विक्रम मोडीत निघाले आहेत?

१. विश्वचषकातील सर्वांत वेगवान शतक (World Cup 2023)

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज अॅडम मार्करम याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केवळ ४९ चेंडूमध्ये शतक झळकावले. त्याने विश्वचषकात सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने १४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने १०६ धावा केल्या. यापूर्वी विश्वचषक स्पर्धेत सर्वात वेगवान शतक आयर्लंडचा फलंदाज केविन ओब्रायन याच्या नावावर होते. त्याने २०११ च्या विश्वचषकात इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ५० चेंडूमध्ये शतक पूर्ण केले होते.

२. दक्षिण आफ्रिकेने उभारली विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या (World Cup 2023)

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. क्विंटन डी कॉक (८४ चेंडूत १०० धावा), रॅसी व्हॅन डर ड्युसेन (५४ चेंडूत १०६ धावा) आणि एडन मार्कराम (५४ चेंडूत १०६) यांच्या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने ५/४२८ अशी मजल मारली. तखाडेबाज फलंदाजीच्या जोरावर द. आफ्रिकेने विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत ६ बाद ४१७ अशी धावसंख्या उभारली होती.

३. पाककडून मोठ्या धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग

हैदराबादमध्ये पाक विरुद्ध श्रीलंका हा सामना रंगला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ३४४ धावा केल्या आणि पाकसमोर ३४५ धावांचे आव्हान ठेवले. पाकने श्रीलंकेच्या ३४५ धावांच्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग करत इतिहास रचला. अब्दुल्ला शफीक (१०३ चेंडूत ११३) आणि मोहम्मद रिझवान (१२१ चेंडूत १३१*) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ४८.२ षटकांत श्रीलंकेच्या आव्हानाच यशस्वीरित्या पाठलाग केला. यासह, पाकिस्तानने एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. (World Cup 2023)

४. विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकवण्याचा विक्रम हिटमॅन शर्माच्या नावावर

विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम आता रोहित शर्माच्या नावावर आहे. विश्वचषकात रोहित शर्मा आणि दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडूलकर या दोघांच्याही नावावर ६ शतक होते. मात्र, अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहितने शतकी खेळी करत सचिनचा विक्रम मोडित काढला. त्याने विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (World Cup 2023)

हेही वाचलंत का?

Back to top button