

पुढारी ऑनलाईन डेस्क : नालेसफाई करताना अनेक कामगार मृत्युमुखी पडतात. नालेसफाई दरम्यान घडणाऱ्या घटनांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला निर्देश दिले आहेत. नालेसफाई दरम्यान कामगार मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबियांना ३० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. एका जनहित याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. (Supreme Court)
गेल्या पाच वर्षांत ३४७ जणांचा नालेसफाई दरम्यान मृत्यू झाला आहे. जुलै २०२२ मध्ये लोकसभेने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत भारतात नाले आणि सेफ्टिक टँक साफ करताना किमान ३४७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४० टक्के मृत्यू उत्तरप्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांमध्ये झाले आहेत. (Supreme Court)
न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिले आहेत. आदेश देताना न्यायालयाने म्हटले की, सफाई करताना अपंगत्व आलेल्यांना भरापाई म्हणून २० लाख रुपये दिले जातील. हाताने मैला साफ करण्याची प्रथा बंद पाहिजे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी पुढाकार घ्यायला हवा. सफाई करताना कामगार मृत्युमुखी पडू नयेत, यासाठी सरकारी यंत्रणांनी समन्वय साधावा. (Supreme Court)