

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी कांग्रेसचे (पवार गट) आमदार रोहित पवार यांनी कंत्राटी भरतीवरुन भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. कंत्राटी भरतीचे खापर आधीच्या सरकारवर फोडणे म्हणजे दिड वर्षांपासून सत्तेत असलेल्या स्वपक्षाच्या नाकर्तेपणावरच एकप्रकारे शिक्कामोर्तब केल्यासारखं आहे, अशी घणाघाती टीका रोहित पवारांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रोहित पवारांनी कंत्राटी भरतीच्या निर्णयावरुन एक फेसबुक पोस्ट केली आहे.
रोहित पवार म्हणाले, कंत्राटी भरतीचा निर्णय कुणाच्या काळात झाला? कुणाचं पाप आहे, कुणी माफी मागावी यात राज्याच्या युवा वर्गाला अजिबात स्वारस्य नाही. युवा वर्गाला केवळ शाश्वत नोकरी हवीय. त्यामुळं अडीच लाख रिक्त पदांची भरती कधी करणार यावर बोला, असा सवालही रोहित पवारांनी सरकारला केला. कंत्राटी भरतीचा पहिला शासन निर्णय (GR) 2 जून 1998 रोजी झाला. त्यामुळं पाप, माफी याबाबत आपण स्वतःच अंतर्मुख होऊन चिंतन करण्याची गरज आहे, असेही रोहित पवार म्हणाले.