कथा एका कल्पक कर्णधाराची | पुढारी

कथा एका कल्पक कर्णधाराची

विश्वचषकाच्या रणभूमीतून : निमिष पाटगावकर

मुंबई आणि पुण्याच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका संपवून दुसर्‍या दिवशी जसे गणेशभक्त थकून भागून परतत असतात तसेच अहमदाबादच्या पाकिस्तानवरच्या विजयाच्या जल्लोषानंतर क्रिकेटभक्त मिळेल त्या वाहनाने रविवार संध्याकाळपर्यंत अहमदाबादहून घरी परतत होते. अहमदाबादच्या स्टेडियमपर्यंत चालण्याने आणि प्रचंड उकाड्याने सर्वांची गात्रे थकली असली, तरी मन तृप्त करणारा हा विजय होता. हा विजय होताच तसा मोठा. विजयाचे श्रेय घ्यायला अनेक वाटेकरी असतात; पण या विजयाचे प्रमुख श्रेय जाते ते कर्णधार रोहित शर्माला. त्याच्यातल्या कर्णधाराच्या डावपेचांनी त्याने आपल्याला विजयाच्या मार्गावर नेले आणि मग त्याच्या फलंदाजीने आपण त्या मार्गावर वाटचाल केली म्हणण्यापेक्षा धावलो म्हणणे जास्त योग्य ठरेल.

आपल्याकडे प्रत्येक खेळाडूची एक प्रतिमा बनवलेली असते. त्यानुसार एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माची प्रतिमा आहे, ती ‘हॅपी गो लकी’ किंवा खुशालचेंडू प्रवृत्तीचा खेळाडू म्हणून.

काहींच्या मते तो कोहलीसारखा फिटनेस वगैरेच्या फारसा वाटेला न जाणारा अत्यंत प्रतिभावान पण सुशेगात किंवा इंझमाम-उल-हकच्या कॅटेगरीतला खेळाडू आहे. या विश्वचषकात आपल्याला रोहित शर्मात दिसत आहे तो एक धूर्त, चाणाक्ष आणि परिस्थितीनुसार डावपेच रचणारा कर्णधार आणि ज्याला ‘लिडिंग फ्रॉम फ्रंट’ म्हणतात, असा भारताला विजयपथावर नेणारा एक उत्तम सलामीवीर. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात अ‍ॅडलेडला आपले लक्ष्य इंग्लड सहज पार करणार म्हणून खांदे पाडलेल्या रोहित शर्मात हा अचानक बदल कसा झाला, तर हा अचानक वगैरे झालेला बदल नाही तर काही सामन्यांवरून आपण लेबले चुकीची लावतो इतकेच.
2011 च्या घरच्या विश्वचषकात आधी दोन वर्षे चांगली कामगिरी करूनही त्याला संघात जागा मिळाली नव्हती हे त्याला खूप लागले होते. मागून येऊन कोहली विश्वचषक विजेत्या संघात पोहोचला होता, पण शर्माला जागा नव्हती. या घटनेने रोहित शर्मात पहिले परिवर्तन कसले झाले असेल ते श्रम घ्यायच्या तयारीत. यानंतर रोहित शर्माचा स्फोटक अवतार आपण एक फलंदाज म्हणून बघितला. घरच्या अत्यंत बेताच्या परिस्थितीतून एक गोलंदाज म्हणून दिनेश लाड यांच्याकडे धडे गिरवायला दाखल झाल्यावर त्याचे रूपांतर हळूहळू मॅच जिंकून देणार्‍या फलंदाजात आणि कर्णधारात झाले. सामना खेळायचा तो जिंकायचाच हा मंत्र तो हॅरिस शिल्ड, गाईल्स शिल्ड या शालेय स्पर्धांपासून गिरवत आहे. त्याचा बोरीवलीची नेटस् ते वानखेडेची नेटस् हा प्रवासही काटेरीच होता. मुंबईच्या अंडर-17 मधून तो मुंबई संघात आला.

एकदा इराणी ट्रॉफीसाठी त्याची संघात निवड झाली होती; पण निरोपातील घोळामुळे त्याला ते कळलेच नाही आणि चार दिवस तो सरावाला आला नाही. मुंबई क्रिकेटच्या कडक शिस्तीत हे बसणारे नव्हते. जेव्हा हा निरोपातील घोळ कळला आणि तो मैदानावर जायला बोरीवलीहून फास्ट लोकलमध्ये लटकून निघाला तेव्हा त्याची किट बॅग माटुंग्याला पडली. वानखेडेला हात हलवत तो पोचल्यावरच आधीच उशिरा आल्याने संघव्यवस्थापनाने त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. जेव्हा कारण कळले तेव्हा रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याची बॅग वानखेडेला पोहोचली आणि त्यानंतर सिलेक्टर्सना बघायला मिळाला तो निव्वळ स्ट्रोक प्ले. इतके होऊनही जेव्हा मोहालीला जायला संघ विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याला वगळल्याचे कळले. कोवळ्या वयात मोठी स्वप्ने बघताना हा आघात होता; पण हे असले आघात पचवूनच तो मोठा झाला आणि त्याचीच फळे आज आपण बघत आहोत.

मुंबई क्रिकेटच्या अशा मुशीतून तयार झाल्यामुळे सामने कसे जिंकायचे हे त्याला चांगले अवगत आहे. या पाकिस्तानच्या सामन्यात त्याने सिराज गेल्या दोन सामन्यांत खूप धावा देत असून, त्याला क्रॉस सीम आणि काई जास्त बाऊन्स वापरायचा दिलेला कानमंत्र, चेंडू जुना झाल्यावर बुमराहला पुन्हा गोलंदाजीला आणून मिळवलेला रिझवानचा बळी किंवा कुलदीप आणि जडेजाचा डावातील मधल्या षटकात केलेला योग्य वापर त्याच्या कर्णधार म्हणून वाढलेल्या प्रगल्भतेची चुणूक दाखवतो. एकदा डावपेच सांगितल्यावर तो गोलंदाजाला आपले डोके वापरायची मुक्त मुभा देतो. या सामन्यात रोहित शर्माला माहीत होते की, बाबर बाद झाला की त्यांचा डाव कोसळणार हे अटळ आहे. बाबर आणि रोहित शर्मा यांच्या कर्णधाराची फलंदाजीमधील इंटेंटमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. बाबरने स्वतःला जखडून घेतले होते. पाकिस्तान आपल्या विकेटस् जपायला प्रतिआक्रमण विसरून गेले होते आणि नेमका याचाच फायदा कर्णधार म्हणून रोहित शर्माने उठवला. आपल्या डावाचा आफ्रिदीचा पहिला चेंडू भिरकावून देताना त्याने आपल्या इराद्यांची कल्पना पाकिस्तानला दिली. गिलने फक्त 16 धावाच केल्या; पण त्या चार चौकारांनी, यातून पुन्हा भारतीयांचे पाकिस्तानला फोडून काढायचे इरादे स्पष्ट झाले.

भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय हा प्रामुख्याने दोन कर्णधारांच्या मानसिकता आणि डावपेचातील फरकाने मिळवलेला आहे. रोहित शर्मा एक प्रगल्भ कर्णधार म्हणून या विश्वचषकात भारताला नव्या उंचीवर नेईल, असे चित्र आता तरी दिसत आहे.

Back to top button