Rahul Dravid : अश्विनची वर्ल्डकप संघात निवड होणार? द्रविड गुरुजींचा मोठा खुलासा, म्हणाले… | पुढारी

Rahul Dravid : अश्विनची वर्ल्डकप संघात निवड होणार? द्रविड गुरुजींचा मोठा खुलासा, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला 66 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पण पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने (Team India) मालिका जिंकली. याआधी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेला हरवून आशिया कप ट्रॉफी जिंकली होती. टीम इंडियाचे सर्व खेळाडू फॉर्मात आहेत आणि चांगली कामगिरी करत आहेत. मात्र आशिया चषकात स्टार अष्टपैलू अक्षर पटेल जखमी झाला होता. त्यावरून प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मोठा खुलासा केला आहे.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दरम्यान, 28 सप्टेंबरपर्यंत संघ त्यांच्या खेळाडूंची अदलाबदल करू शकतात. म्हणजेच 28 सप्टेंबरपर्यंत सर्व संघांना त्यांच्या अंतिम 15 खेळाडूंची यादी आयसीसीकडे (ICC) सोपवायची आहे. त्याचवेळी अक्षर पटेलच्या (Akshar Patel) दुखापतीमुळे अश्विनचा विश्वचषक संघात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडेच त्याचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघात (Team India) समावेश करण्यात आला होता. अश्विननेही (R Ashwin) चमकदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला विश्वचषक संघात संधी मिळू शकते हे निश्चित झाले आहे. त्याचवेळी आता संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अश्विनच्या वनडे संघात पुनरागमन करण्याबाबत मत व्यक्त केले आहे.

द्रवीड म्हणाले, ‘अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली ते पाहून खरोखरच खूप छान वाटले. मात्र, खेळाडूंची अदलाबदल करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल. एनसीए बीसीसीआय निवड समितीच्या संपर्कात आहे. त्यामुळे मी यावर कोणतेही विधान करणार नाही. काही बदल असल्यास कळविण्यात येईल.’

‘दुखापतीतून परतलेल्या जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. या खेळाडूंना एकदिवसीय विश्वचषकापूर्वी सामन्यांचा सराव मिळाला त्याबद्दल मी समाधानी आहेत. पाठीच्या समस्येमुळे बराच काळ बाहेर असलेल्या बुमराहने मोहाली आणि राजकोटमध्ये दहा षटके टाकली. मात्र, तिसऱ्या वनडेत तो महागडा ठरला. श्रेयसने काही चांगल्या खेळी खेळल्या. आम्हाला विश्वचषकात ही गती कायम राखायची आहे,’ असेही मत राहुल द्रविड यांनी व्यक्त केले.

गेल्या महिन्यात आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत पुनरागमन करणाऱ्या बुमराहने श्रीलंकेत आशिया कपही खेळला होता. श्रेयस अय्यरने इंदूरमध्ये शतक तर राजकोटमध्ये 48 धावा केल्या. केएल राहुलने दोन अर्धशतके झळकावण्यासोबतच उत्कृष्ट यष्टिरक्षणही केले.

Back to top button