Sanju Samson : तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची! | पुढारी

Sanju Samson : तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची!

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक 2023 स्पर्धा जिंकली आणि आता ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत रोहितसह विराट कोहली, हार्दिक पंड्या व कुलदीप यादव यांना विश्रांती दिली गेली आहे. पुन्हा एकदा भारताचा विकेटकिपर-फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) मोठ्या स्पर्धेसाठी संघात संधी मिळाली नाही.

संघाच्या घोषणेनंतर लगेचच, सॅमसनच्या चाहत्यांनी लगेच आपली निराशा व्यक्त केली. आज संजूने इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, जे आहे ते आहे..! मी पुढे जात राहणे निवडतो..! चाहतेही त्याच्या लढवय्या वृत्तीला सलाम करीत आहेत. एका चाहत्याने त्याला रिप्लाय देताना म्हटले आहे की… तू चाल पुढे, तुला रं गड्या भीती कशाची!

वेस्ट इंडिजविरुद्ध 1 ऑगस्ट 2023 झालेल्या शेवटच्या वन-डे सामन्यात संजूने अर्धशतक झळकावले होते. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघात तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता आणि त्याने 4 षटकार आणि 2 चौकार मारून 41 चेंडूंत 51 धावा केल्या होत्या. सॅमसनने 12 वन-डे डावात 55.71 च्या सरासरीने तीन अर्धशतकांसह 390 धावा केल्या आहेत. (Sanju Samson)

सॅमसन भारताच्या आशियाई क्रीडा 2023 च्या संघाचा भाग नाही. भारताच्या आशियाई क्रीडा 2023 संघाचा कर्णधार असलेल्या ऋतुराज गायकवाडचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वन-डे सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला होता. तसेच, संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवचे संघातील स्थान कायम ठेवले आहे. ज्याने वन-डे क्रिकेटमध्ये फार चांगली कामगिरी केलेली नाही. वेस्ट इंडिज दौर्‍यावरही तो अपयशी ठरला आणि त्याला आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. पण, तिथेही सूर्या 26 धावा करू शकला. त्याने 25 इनिंग्जमध्ये 24.40च्या सरासरीने 537 धावा केल्या आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये त्याने शेवटचे अर्धशतक झळकावले होते.

आर. अश्विनचे संघात पुनरागमन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत यष्टीमागे लोकेश राहुल व इशान किशन हे दोन स्पर्धक आहेत. त्यांच्याशिवाय सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि शुभमन यांचे स्थान कायम आहे. तिलक वर्माला पहिल्या दोन वन-डे सामन्यात निवडले आहे. आर अश्विन भारताच्या वन-डे संघात परतला आहे. वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात अश्विनचे नाव नाही आणि त्याला आशिया चषक स्पर्धेतही खेळवले नाही. अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे अश्विनला संधी मिळाली.

Back to top button