Asia Cup 2023 : पाकिस्तानशी क्रीडासंबंध धोरण की राजकारण? | पुढारी

Asia Cup 2023 : पाकिस्तानशी क्रीडासंबंध धोरण की राजकारण?

स्वीच हिट : निमिष पाटगावकर

आशिया चषकाच्या लढती सुरू झाल्या आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघांसाठी जेमतेम दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या विश्वचषकाची ही पूर्वतयारी आहे. स्पर्धा सुरू होण्याआधी रंगले ते या आशिया चषकाच्या आयोजनामागील राजकारण. गेले कित्येक महिने हे गुर्‍हाळ सुरू होते. याची परिणीती म्हणजे या आशिया चषकाचा यजमान पाकिस्तान असून ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांत खेळली जाईल अशी धेडगुजरी संकल्पना राबविण्यात आली. पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या विविध खेळपट्ट्यांवर खेळून आता आपण आशियाचा राजा शोधणार.

या सर्व गोंधळाची सुरुवात झाली ती सुरक्षेच्या कारणास्तव आपण जेव्हा पाकिस्तानमध्ये खेळण्यास असमर्थता दर्शवली तेव्हा. राजकीय तणावपूर्ण संबंध आणि सुरक्षेचे कारण हे पाकिस्तानशी न खेळायचे आपले गेल्या कित्येक वर्षांचे कारण आहे. यामागे नक्की धोरण कोणते, हे संभ्रमात टाकणारे आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष जे बीसीसीआयचे कार्यवाह आहेत त्या जय शाह यांनी आयसीसीला भारतीय संघ पाकिस्तानात खेळणार नसल्याचे कळविले. तिथपासून या राजकारणाला सुरुवात झाली. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतात होणार्‍या विश्वचषकातून अंग काढून घ्यायची धमकी दिली. दोन बोर्डांतील हा खेळ काही आठवडे चालला. त्यानंतर आशिया चषकाचे यजमान पाकिस्तानच असेल, मात्र, भारताचे सामने श्रीलंकेत होतील व पाकिस्तानचा संघ भारतात होणार्‍या विश्वचषकात खेळेल हा अपेक्षित तोडगा निघाला आणि या राजकारणावर पडदा पडला.

खरे तर या वादाची सुरुवात आधीच व्हायला हवी होती. आयसीसी किंवा आशिया क्रिकेट कौन्सिल यांच्या स्पर्धेतून बाहेर पडणे हे तितके सोपे नाही हे माहीत असताना हा भारत-पाकिस्तान बोर्डांतील वाद नेहमी उफाळून येतो आणि गुपचूप संपतो. भारत आज क्रिकेटमधील महासत्ता आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारताची प्रत्येक गोष्ट गुमान ऐकण्याशिवाय पर्याय नसतो. इथे मुळात प्रश्न आहे तो भारताला पाकिस्तानात खेळायचे नाही ते भारत-पाकिस्तान राजकीय संबंधांमुळे की पाकिस्तानातील सुरक्षेवर आपला विश्वास नाही म्हणून? यावेळेला तरी आयसीसीच्या पत्रात सुरक्षेचे कारण दिले होते. पाकिस्तानात आता राजकीय गदारोळात (जो कायमच असतो) न्यूझीलंड, इंग्लड, ऑस्ट्रेलियासारखे संघ खेळायला जायला लागले आहेत. श्रीलंकेन संघाच्या बसवर पाकिस्तानात2009 साली गोळीबार झाला होता आणि पाकिस्तानातले आंतरराष्ट्रीय क्रिकेट थांबले. या 2009 च्या घटनेनंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाले ते 2015 मध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानचा दौरा केल्यावर. 2017 साली श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध मालिका युएईमध्ये खेळली. तथापि, एक ट्वेन्टी-ट्वेन्टी सामना लाहोरला खेळून परिस्थितीची चाचपणी केली आणि मग श्रीलंका संघानेही 2019 साली पाकिस्तानचा दौरा केला. त्या दौर्‍यात श्रीलंकेच्या 7 खेळाडूंनी जायला नकार दिला. तरीही त्यांच्या बोर्डाने संघ पाठवला. पाकिस्तान सुपर लीगमध्ये अनेक परदेशी खेळाडू पाकिस्तानात खेळायला यायला लागले . 2009 च्या घटनेनंतर नंतर परदेशी खेळाडूंना विशेषतः संघाला पाकिस्तान परदेशी पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांच्या दर्जाची सुरक्षा पुरवते. क्रिकेट हा ग्लॅमरस खेळ असल्याने आपण त्याबद्दलच चर्चा करतो. मात्र, जेव्हा नुकतेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रानखान यांना पदच्युत करताना पाकिस्तानात जो सावळागोंधळ चालू होता तेव्हा भारताची ब्रिजची टीम पाकिस्तानात लाहोरमध्ये स्पर्धा खेळत होती. या गोंधळाचा स्पर्धेला काहीही त्रास नव्हता. तरीही या संघाला लाहोरच्या हॉटेलमध्येच पूर्ण सुरक्षा पुरवली होती. या संघातल्या आपल्या खेळाडूंनी परत आल्यावर त्यांची बडदास्त आणि सुरक्षा उच्च प्रतीची होती, असे म्हटले आहे. ब्रिजपटू पाकिस्तानात जाऊ शकतात. मात्र, क्रिकेटपटूंबाबत राष्ट्रीय धोरण असू शकत नाही? पाकिस्तानबरोबर सर्व क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय संबंध तोडायचे हे धोरण असेल तर जागतिक स्तरावर तेही शक्य नाही. आपण क्रिकेटच्या आयसीसी स्पर्धांत आणि आशियाई स्पर्धांत एकत्र खेळतो. नीरज चोप्रा पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमबरोबरगळ्यात गळे घालून पदक मंचावर उभा असतो. सॅफ स्पर्धेत पाकिस्तानी फुटबॉल संघ भारतात, विश्वचषकातही तसेच दिसून येते.

आता पाकिस्तानी संघ भारतात खेळणार आहे. विविध हॉकी स्पर्धांत आपण एकत्र खेळतो. इतकेच नाही पाकिस्तानी खेळाडूंना आपण आयपीएलमध्ये पहिल्या हंगामांनंतर बंदी घातली. तथापि, निवृत्त भारतीय क्रिकेटपटूंना जे बोर्डाच्या निवृत्त खेळाडूंच्या विविध योजनांचा लाभ घेतात, त्यांना पाकिस्तानी खेळाडूंबरोबर एकाच संघात खेळायला परवानगी देतो. अबुधाबी टी-10, लिजंड लीग, लंका प्रीमियर लीग, नेपाळ टी ट्वेन्टी लीग आणि कॅरेबियन प्रीमियर लीग या पाच लीगमध्ये निवृत्त भारतीय खेळाडू आणि पाकिस्तानी खेळाडू एकाच संघात असतात. हे सर्व बघता भारतचे पाकिस्तानशी वेगवेगळ्या खेळांबाबत आणि वेगवेगळ्या स्पर्धेबाबत वेगळे धोरण असल्याचे दिसून येते. पाकिस्तानशी क्रीडा संबंध पूर्णपणे तोडणे शक्य नाही हे दोन्ही देशांना माहीत आहे. पाकिस्तान भारतात येऊ शकते, पण भारत पाकिस्तानात जाणार नाही हे धोरण असेल तर तेही सर्वच खेळांना लागू नाही. सर्व राजकारण आणि सुरक्षेचे कारण बाजूला ठेवून विचार केला तर क्रिकेट, हॉकी अथवा भालाफेक असो क्रीडारसिकांना कुठच्याही क्रीडाप्रकारात तुल्यबळ पाकिस्तानशी लढत बघायला हवी आहे. 2007 नंतर भारत पाकिस्तानशी कसोटी क्रिकेट मालिका खेळलेला नाही आणि 2012 नंतर मर्यादित षटकांची मालिका खेळलेला नाही.

भारतातून पाकिस्तानात गेलेले पत्रकार, प्रेक्षक आणि खेळाडू पाकिस्तानच्या आयोजनाबद्दल आणि पाहुणचाराबद्दल कधी तक्रार केलेली वा ऐकलेली नाही. तेव्हा पाकिस्तानशी खेळायचे हे आपले राष्ट्रीय धोरण नक्की झाले तर किमान तटस्थ ठिकाणी तरी भारत पाकिस्तान या आशियातल्या अ‍ॅशेसच्या लढती बघण्याची आशा ठेवता येते. तूर्त या राजकारणाने आणि संदिग्ध धोरणामुळे प्रत्येक मोठ्या स्पर्धेआधी हे वाद उफाळून येण्याला पर्याय नाही.

 

 

Back to top button