IND vs AFG : टीम इंडियाचा पहिला विजय, सर्वोच्च धावसंख्येची नोंद | पुढारी

IND vs AFG : टीम इंडियाचा पहिला विजय, सर्वोच्च धावसंख्येची नोंद

अबुधाबी; वृत्तसंस्था : (IND vs AFG) रोहित शर्मा (74), के. एल. राहुल (69) यांच्या अर्धशतकी आतषबाजीनंतर ऋषभ पंत (नाबाद 27) व हार्दिक पंड्या (नाबाद 35) यांची फटकेबाजी तसेच मोहम्मद शमी (3/32) व आर. आश्‍विन (2/14) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने अफगाणिस्तानला 66 धावांनी पराभूत करून टी-20 वर्ल्डकपमध्ये निराशाजनक दोन पराभवांनंतर दुसर्‍या गटात पहिला विजय मिळवत 2 गुणांची कमाई केली. भारताने 210 ही या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली.

विजयासाठी 211 धावांचे टार्गेट असताना अफगाणिस्तानने 20 षटकांत 7 बाद 144 धावा जमविल्या. शमीने मोहम्मद शहजादला (0), तर बुमराहने हजरतुल्लाह झजाईला (13) बाद करून अफगाणिस्तानची सुरुवातीलाच 2 बाद 13 अशी स्थिती केली. त्यानंतर रहमनुल्लाह गुरूबाजला (19)जडेजाने हार्दिककडे झेल देण्यास भाग पाडले. (IND vs AFG)

तर आर. आश्‍विनने नईबला (18) पायचित केले. त्यानंतर आश्‍विननेच झद्रानचा (11) त्रिफळा उद्ध्वस्त केला. तर शमीने नबीला (35) जडेजाकरवी व त्यानंतर राशिद खानला (0) बाद केले. शेवटी करिम जनत 42 तर अश्रफ 2 धावांवर नाबाद राहिला. भारताच्या वतीने शमीने 3, तर आश्‍विनने 2 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 बाद 210 अशी भक्‍कम धावसंख्या उभारली. रोहित व राहुल यांनी आक्रमक सुरुवात केली. रोहितने 37 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर राहुलनेही आपले अर्धशतक 35 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने पूर्ण केले. रोहित हा करीम जनतच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मोहम्मद नबीकडे झेल देऊन परतला. रोहितने 47 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा काढल्या. भारताची पहिला गडी 140 वर बाद झाला.

रोहितपाठोपाठ राहुलही बाद झाला. राहुलने 48 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 69 धावा काढल्या. राहुल परतल्यानंतर हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आला. 18 व्या षटकाअखेर भारताच्या 2 बाद 175 धावा झाल्या होत्या. त्यानंतर पंत व हार्दिक या जोडीने धावांचा पाऊस पाडताना 3.2 षटकांत 62 धावांचा पाऊस पाडला. पंत 13 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 27, तर हार्दिक 13 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 35 धावांवर नाबाद राहिला. (INDvsAFG)

भारत : 20 षटकांत 2 बाद 210, रोहित 74, राहुल 69, पंत नाबाद 27, हार्दिक नाबाद 35, गुलाबदिन नईब व करीम जनत प्रत्येकी 1 विकेट.

अफगाणिस्तान : 20 षटकांत 7 बाद 144, करीम जनत नाबाद 42, नबी 35, शमी 32 धावांत 3, तर आर. आश्‍विन 14 धावांत 2 विकेट.

भारत सेमी फायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?

* भारताला आता दि. 5 रोजी स्कॉटलंडला आणि दि. 8 रोजी नामीबियाला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल.

* खासकरून न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्याच्या निकालावरही भारताला अवलंबून राहावे लागणार आहे. अफगाणिस्तानने किवी संघाला पराभूत केले तरच याचा लाभ भारताला मिळेल.

* न्यूझीलंड व अफगाणिस्तान यांच्यापेक्षाही भारताला रन रेट अधिक सरस करावा लागणार आहे.

Back to top button