T20 Team India Squad : विंडिजविरुद्ध सुर्यकुमार यादव उपकर्णधार! ‘या’ मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा | पुढारी

T20 Team India Squad : विंडिजविरुद्ध सुर्यकुमार यादव उपकर्णधार! ‘या’ मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 Team India Squad : वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने टी-20 संघाची घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद पुन्हा एकदा हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले आहे. तर सूर्यकुमार यादवला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद शमी या दिग्गज खेळाडूंना या फॉरमॅटमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. तर आयपीएल 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

अलीकडेच भारताच्या कसोटी संघात निवड झालेला युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला टी-20 संघातही स्थान देण्यात आले आहे. यासह शुभमन गिल आणि ईशान किशन यांचीही संघात निवड झाली आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचेही संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर अक्षर पटेलची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

तिलक वर्माला संधी, रिंकूकडे दुर्लक्ष

तिलक वर्मा यांची संघात निवड झाली आहे. त्याने अलीकडेच आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी केली होती. दुसरीकडे, आश्चर्याची बाब म्हणजे आयपीएलमध्ये वेगवान फलंदाजी करणाऱ्या रिंकू सिंहची निवड झालेली नाही. रिंकूने आयपीएलमध्ये 60 च्या सरासरीने धावा केल्या होत्या, पण निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे.

‘या’ खेळाडूंची गोलंदाज म्हणून निवड

युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीची संघाच्या फिरकी गोलंदाज विभागात निवड करण्यात आली आहे. याशिवाय रवी बिश्नोईच्या रूपाने संघात आणखी एका फिरकी गोलंदाज असेल. शिवाय अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

भारतीय संघ असा आहे…

इशान किशन (विकेटकिपर) , शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार

Back to top button