नाशिक : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर तरीही लासलगावी पाणी प्रश्न बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी

लासलगाव : ग्रामपंचायत येथे पाणी प्रश्न संदर्भात मार्गदर्शन करताना तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी महेश पाटील, जयदत्त होळकर आदी
लासलगाव : ग्रामपंचायत येथे पाणी प्रश्न संदर्भात मार्गदर्शन करताना तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी महेश पाटील, जयदत्त होळकर आदी
Published on
Updated on

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
लासलगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (दि. ८) लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थित आयाेजित बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकऱ्यांनी मात्र दांडी मारली. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्ठात आल्याने लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. १५ दिवसानंतरही पाणी मिळत नसल्याने लासलगावकरांनी पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. या बाबत 'दै. पुढारी' ने मंगळवारी (दि. ७ ) '१५ दिवस पाणी मिळेना, तर मतदान कशाला' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर लासलगाव ग्रामपंचायतीत बैठक घेतली. मात्र, लासलगाव पाणी प्रश्न बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची दांडी मारल्याने नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली. बैठकीला गटविकास अधिकारी महेश पाटील, लासलगावचे माजी सरपंच जयदत्त होळकर, ग्रामीण पाणी पुरवठा पंचायत समिती अभियंता संदीप शिंदे, तलाठी नितीन केदार व ग्रामसेवक लिंगराज जंगम उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्कीच गंभीर आहे. तो वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल. गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणात पाणी पोहोचेल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. नागरिकांनी मतदानावर टाकलेल्या बहिष्कार मागे घ्यावा. – विशाल नाईकवाडेल, तहसीलदार निफाड.

या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित नसल्याने सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होत नाही, तोपर्यंत लोकसभा मतदान बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सदर लासलगाव १६ गाव पाणी योजना ही सुरळीत चालण्यासाठी ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्वतः चालवावी हे दोन प्रमुख निर्णय यावेळी घेण्यात आले. या बैठकीत प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य अमोल थोरे, दत्ता पाटील, विकास कोल्हे, संदीप उगले, राजेंद्र कराड, स्मिता कुलकर्णी, नितीन शर्मा, बाळासाहेब सोनवणे, शेखर कुलकर्णी, अनिल ठोके, महेंद्र हांडगे, मयूर झांबरे यांच्यासह ग्रामस्थ यांनी चर्चेत सहभाग घेतला.

पिण्याच्या पाण्यासारख्या गंभीर प्रश्नासाठी बोलावलेल्या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनी पाठ फिरवल्याने सदर बैठक ही गुरुवारी घेण्याची ठरले आहे. १६ गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत चालण्यासाठी ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तातडीने वर्ग केल्यास सदर प्रश्न लवकर सुटू शकेल. – जयदत्त होळकर, माजी सरपंच, लासलगाव.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news