MI vs GT : सूर्याचा सुपला शॉट चुकला अन् मुंबईच्या हातून विजय हुकला | पुढारी

MI vs GT : सूर्याचा सुपला शॉट चुकला अन् मुंबईच्या हातून विजय हुकला

गुजरात टायटन्सने क्वालिफायर 2 सामन्यांत मुंबई इंडियन्सवर 62 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. गतविजेत्या गुजरात टायटन्सला जेतेपद कायम राखण्यासाठी आज (रविवारी) चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना करावा लागणार आहे. मुंबईच्या पराभवाची अनेक कारणे असली तरी जोपर्यंत सूर्या मैदानावर होता, तोपर्यंत मुंबईकर चाहते कॉन्फिडंट होते, परंतु मोहितच्या चेंडूवर सूर्याचा सुपला शॉट चुकला आणि मुंबईचा विजय हुकला. (MI vs GT)

शुबमन गिलचे शतक अन् साई सुदर्शनसोबतच्या त्याच्या भागीदारीने गुजरात टायटन्सला फ्रंटसिटवर बसवले. गुजरात टायटन्सने 233 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मोहित शर्माने 14 चेेेंडूत 5 विकेट घेत मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ 171 धावांत माघारी पाठवला.

शुभमन गिलने 60 चेंडूंत 7 चौकार व 10 षटकारांसह 129 धावा चोपल्या. शुभमन व साई सुदर्शनसह 64 चेंडूंत 138 धावा जोडल्या. सुदर्शनला 43 (31 चेंडू) धावांवर रिटायर्ड आऊट व्हावे लागले. हार्दिकने 13 चेडूंत 28 धावा करताना गुजरातला 3 बाद 233 धावांपर्यंत पोहोचवले.

शुभमन गिलला सुरुवातीला दोन जीवदान देणे मुंबई इंडियन्सला महागात पडले. टीम डेव्हिडने एक झेल टाकला, तर तिलक वर्मासाठी एक सोपा झेल चालून आला होता, परंतु त्याच्याकडून तसा प्रयत्नच झाला नाही. यामुळे रोहित शर्मा प्रचंड नाराज झालेला दिसला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कामगिरी आज सुमार राहिली.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरण्यापूर्वी इशान किशनला दुखापत होणे, हा मुंबईसाठी खूप मोठा धक्का होता. ख्रिस जॉर्डनचा कोपरा लागून इशानला ही दुखापत झाली आणि तो फलंदाजीला आलाच नाही. त्यात रोहित शर्मा खेळेल असे वाटले होते, परंतु चुकीचा फटका मारून तो झेलबाद झाला.

तिलक वर्मा (43) व सूर्यकुमार यादव (61) यांनी मॅच आणून दिली होती. परंतु चुकीच्या फटक्यांनी घात केला. सूर्यकुमार व कॅमेरून ग्रीन (30) यांनीही अर्धशतकी भागीदारी केली. हे दोघंही चुकीचे फटके मारून त्रिफळाचीत झाले. सूर्यकुमारचा सुपला शॉट पुन्हा चुकला अन् तिथेच सामना मुंबईच्या हातून गेला.

मोहित शर्माने त्याच्या 2.2 षटकांत 10 धावा देत 5 विकेट्स घेत मुंबईचा पूर्णपणे स्पर्धेबाहेर फेकून दिले. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता न येणे हे त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.

हेही वाचा;

Back to top button