राहुल द्रविड यांच्या पदग्रहणाची तयारी सुरू | पुढारी

राहुल द्रविड यांच्या पदग्रहणाची तयारी सुरू

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासहीत इतर पदांसाठीदेखील अर्ज मागवले आहेत. माजी कर्णधार आणि सध्याचे राष्ट्रीय क्रिकेट अ‍ॅकॅडमी प्रमुख राहुल द्रविड यांना प्रशिक्षक बनविण्यासाठी बोर्डाने औपचारिक प्रक्रिया सुरू केल्याचे बोलले जात आहे.

आयपीएलच्या फायनलदरम्यान बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि राहुल द्रविड यांच्यादरम्यान बैठक झाली होती. यामध्ये द्रविड यांनी प्रशिक्षकपदासाठीचा प्रस्ताव स्वीकारला होता.

टी-20 विश्वचषक संपल्यानंतर रवी शास्त्री यांच्या युगाची सांगता होईल आणि संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी द्रविड स्वीकारतील. ते 2023 पर्यंत संघाचे प्रशिक्षक असतील. दुसरीकडे पारस म्हाम्ब्रेदेखील गोलंदाजी प्रशिक्षक बनणे हेदेखील निश्चित समजले जात आहे.

फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर यांचे पद सध्या कायम राहील आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडदेखील आपले पद कायम ठेवतील, अशी माहिती मिळत आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा कार्यकाळ टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपणार आहे.

या पदांसाठी मागवले बीसीसीआयने अर्ज :

मुख्य प्रशिक्षक : (सीनिअर पुरुष संघ)
फलंदाजी प्रशिक्षक : (सीनिअर पुरुष संघ)
गोलंदाजी प्रशिक्षक : (सीनिअर पुरुष संघ)
फिल्डिंग प्रशिक्षक : (सीनिअर पुरुष संघ)
हेड स्पोर्टस् सायन्स/एनसीएसोबत चिकित्सा

पाँटिंगने नाकारली होती ऑफर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू रिकी पाँटिंगशी संपर्क साधला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने बीसीसीआयची ऑफर नाकारली.

पाँटिंग सध्या आयपीएल फ्रेंचाईझी दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित आहे. पाँटिंगने सूत्रे स्वीकारल्यापासून दिल्ली संघाचा चेहरामोहरा बदलला आहे. दिल्लीची टीम गेल्या तीन वर्षांपासून ‘प्ले ऑफ’मध्ये स्थान मिळवत आहे. याशिवाय, दिल्ली संघ ‘आयपीएल-2020’चा उपविजेताही बनला आहे. पाँटिंगच्या नकाराचे कारण समोर आलेले नाही.

Back to top button