आयपीएलचा आज-उद्या कोल्हापुरात थरार | पुढारी

आयपीएलचा आज-उद्या कोल्हापुरात थरार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध टाटा आयपीएल 2023 चा लाईव्ह थरार क्रीडानगरी कोल्हापुरातील क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. स्टेडियममधील टी-20 सामन्यांचा अनुभव त्यांना कोल्हापुरात बसून मिळणार आहे. रुईकर कॉलनीतील मनपा मैदानावर उभारण्यात आलेल्या फॅन पार्कच्या माध्यमातून शनिवार, दि. 29 व रविवार, दि. 30 एप्रिल रोजी दुपारी 3 ते रात्री 10 यावेळेत ही संधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे प्रतिनिधी अनंत दातार व जिल्हा क्रिकेट असो.चे अध्यक्ष चेतन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयपीएलचे यंदा 16 वे वर्ष असून 31 मार्च ते 28 मे या कालावधीत देशातील विविध राज्यांत ही स्पर्धा सुरू आहे. मात्र, प्रत्येकालाचा स्टेडियममध्ये जाऊन ही स्पर्धा पाहणे शक्य नाही. अशा लोकांसाठी स्टेडियममधील सामन्यांचा थरार अनुभवता यावा, या उद्देशाने फॅन पार्क ही संकल्पना गेल्या काही वर्षांपासून यशस्वीपणे राबविली जाते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही फॅन पार्कचे भव्य आयोजन केले आहे. देशातील तब्बल 45 शहरांमध्ये फॅन पार्कचे नियोजन असून त्यापैकी महाराष्ट्रातील 5 शहरांमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे.

शाहूनगरी कोल्हापुरात चौथ्यांदा फॅनपार्क होणार आहे. दुपारी 3 ते 10 यावेळेत आयपीएल सामन्यांचा थरार कोल्हापुरातील क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. 32 बाय 18 च्या भव्य एलईडी स्क्रीनवर दि. 29 रोजी दुपारी 3 वाजता, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स आणि रात्री 7 वाजता, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल तसेच दि. 30 रोजी, दुपारी चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज आणि रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध राज्यस्थान रॉयल्स यांच्यातील सामने पाहायला मिळणार आहेत.

फॅन पार्कला मैदानाचे स्वरूप प्राप्त करून देण्यात आले आहे. विविध खाद्यपदार्थ, मनोरंजन, लकी ड्रॉ, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था अशा विविधतेने नटलेल्या फॅन पार्कमध्ये एकावेळी सुमारे 15 हजार क्रीडाप्रेमी बसू शकतील. याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले पत्रकार परिषदेस केदार गयावळ, अभिजित भोसले आदी उपस्थित होते.

Back to top button