PAK vs NZ : मार्क चॅपमनचे शतक; न्यूझीलंडची पाकिस्तानविरुद्ध बरोबरी | पुढारी

PAK vs NZ : मार्क चॅपमनचे शतक; न्यूझीलंडची पाकिस्तानविरुद्ध बरोबरी

रावळपिंडी, वृत्तसंस्था : मार्क चॅपमनने पहिलेवहिले टी-20 शतक झळकावल्यानंतर न्यूझीलंडने (PAK vs NZ) पाकिस्तानविरुद्ध पाचव्या व शेवटच्या लढतीत 2-2 अशी बाजी मारली आणि 5 सामन्यांची ही मालिका 2-2 अशा बरोबरीत रोखली. या लढतीत पाकिस्तानने 5 बाद 193 धावांचा डोंगर रचला. मात्र, प्रत्युत्तरात किवीज संघाने 19.2 षटकांत 4 बाद 194 धावांसह धमाकेदार विजय संपादन केला. सामनावीर व मालिकावीर अशा संयुक्त पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या मार्क चॅपमनने या लढतीत 57 चेंडूंत नाबाद 104 धावांची आतषबाजी केली. त्याच्या या धुवाँधार खेळीत 11 चौकार व 4 षटकारांचा समावेश राहिला.

विजयासाठी 194 धावांचे कडवे आव्हान असताना टॉम लॅथम (0), बोवेस (19), विल यंग (4), डॅरेल मिशेल (15) असे आघाडीचे 4 फलंदाज स्वस्तात गारद झाले व यामुळे किवीज संघाची 9.5 षटकांत 4 बाद 73 अशी दारुण अवस्था होती. मात्र, मिशेल चौथ्या गड्याच्या रूपाने बाद झाला, हेच पाकिस्तान संघासाठी शेवटचे यश ठरले. त्यानंतर शतकवीर चॅपमनने जेम्स नीशमच्या साथीने 9.3 षटकांत पाचव्या गड्यासाठी 121 धावांची अभेद्य भागीदारी साकारत न्यूझीलंडला एकतर्फी विजय मिळवून दिला. शाहिन, इमाद यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. यासह 5 सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली.

रिझवानचे शतक हुकले (PAK vs NZ)

तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर पाकिस्तानने 20 षटकांत 5 बाद 193 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर मोहम्मद रिझवानची 98 धावांची धुवाँधार खेळी त्यांच्या डावाचे ठळक वैशिष्ट्य ठरले. रिझवानने चौफेर फटकेबाजी करताना 62 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारांसह 98 धावांची आतषबाजी केली व याच धावसंख्येवर तो नाबादही राहिला. मधल्या फळीत इफ्तिकार अहमदने 22 चेंडूंत 36, तर इमाद वासीमने 14 चेंडूंत जलद 31 धावांचे योगदान दिले. फहिम अश्रफ एका धावेवर नाबाद राहिला. (PAK vs NZ)

किवीज संघातर्फे ब्लेयर टिकनर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकांत 33 धावांत 3 बळी घेतले. ईश सोधीने 21 धावांत 1 गडी बाद केला.

हेही वाचा…

Back to top button