WTC Final : …तर रोहित आणि विराट ‘आयपीएल प्ले ऑफ’ काळातच लंडनला होणार रवाना | पुढारी

WTC Final : ...तर रोहित आणि विराट 'आयपीएल प्ले ऑफ' काळातच लंडनला होणार रवाना

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२३ स्‍पर्धेतील रोमांच आता शिगेला पोहचला आहे. हंगामाच्या मध्यावर विजयासाठी सुरू असलेल्या खेळांमुळे क्रीडा प्रेमींना चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. या दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. (WTC Final)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जून ते ११ जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. हा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी शिव सुंदर दास यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियाची निव़ड करणार आहे.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कसोटी क्रिकेटर्ससह लंडनला रवाना होणार आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ‘इनसाइड’स्पोर्टला दिलेल्या माहितीनुसार, ‘राहुल द्रविड मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लंडनला रवाना होणार आहेत.

त्यांच्यासोबत संघातील काही कसोटी क्रिकेटपटू आयपीएल संघाची वचनबद्धतेची पूर्तता करून लंडनसाठी रवाना होतील. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएलच्या प्ले ऑफ फेरीमध्ये पोहोचले नाहीत तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीही टीम इंडियासोबत लंडनला रवाना होऊ शकतात. हे दोन्‍ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारल्‍यास विराट आणि रोहित आयपीएलमध्‍ये खेळतील. आयपीएल फ्‍ले ऑफ सामने २३ ते २६ मे पर्यंत होतील. तर आयपीएलचा अंतिम सामना २८ मे रोजी होणार आहे.

 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जून ते ११ जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. फलंदाज श्रेयस अय्यरच्या पाठीच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. श्रेयसच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी अजिंक्य रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमारकडे इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्याचा अनुभव नसल्यामुळे निवडकर्ते  अंतिम सामन्यासाठी अजिंक्य रहाणेला संघात स्थान देतील, असे मानले जात आहे.

हेही वाचा;

Back to top button