CSK vs SRH : हैदराबादविरुद्ध लढतीत चेन्नईला स्टोक्सचे पुनरागमन अपेक्षित | पुढारी

CSK vs SRH : हैदराबादविरुद्ध लढतीत चेन्नईला स्टोक्सचे पुनरागमन अपेक्षित

चेन्नई, वृत्तसंस्था : चारवेळचे चॅम्पियन्स चेन्नई सुपर किंग्जचा संघ (CSK vs SRH) आज आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध लढणार असून इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स येथे निवडीसाठी उपलब्ध असेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. स्टोक्स यापूर्वी तळपायाच्या दुखापतीने त्रस्त असल्याने आयपीएलच्या तीन सामन्यांत खेळू शकला नव्हता. या दुखापतीतून सावरल्यानंतर बुधवारी त्याने पूर्ण वेळ सराव केला. यामुळे चेन्नईला दिलासा लाभला.

चेन्नईने यापूर्वी घरच्या मैदानावर आरसीबीविरुद्ध निसटता विजय संपादन केला होता. हैदराबादला मात्र मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. डेव्हॉन कॉन्वे व ऋतुराज गायकवाड उत्तम बहरात असल्याने चेन्नई सुपर किंग्जला आघाडी फळीत फारशी चिंता नाही. शिवाय, शिवम दुबेने देखील काही उत्तम डाव साकारले आहेत.

अजिंक्य रहाणेने या हंगामात मनमुराद फटकेबाजीवर भर दिला असून चेन्नईतील चाहत्यांना धोनीची बॅट तळपणे अधिक पसंत असेल. चेन्नईचे फलंदाज उत्तम बहरात असताना त्या तुलनेत त्यांचे गोलंदाज मात्र सातत्य राखू शकलेले नाहीत. शिवाय, त्यांचे क्षेत्ररक्षण देखील साधारण दर्जाचे राहिले आहे. लंकन मध्यमगती गोलंदाज मथिशा पथिराणाने आरसीबीविरुद्ध लक्षवेधी मारा केला. मात्र, अन्य गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्या तुलनेत तुषार देशपांडेने प्रत्येक सामन्यागणिक सरस मारा साकारला आहे. (CSK vs SRH)

संबंधित बातम्या

चेन्नईला यापूर्वी राजस्थान रॉयल्सविरुद्ध मागील लढतीत 3 धावांनी निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मध्यफळी अपयशी ठरली आणि धोनी-जडेजाचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले नव्हते.

सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज फिरकी मार्‍याला सामोरे जाताना झगडतात, असे प्राथमिक चित्र असून या पार्श्वभूमीवर चेन्नईची बरीचशी भिस्त तिक्षणा, जडेजा व मोईन अली या फिरकी त्रिकुटावर असणार आहे. चेन्नईने हैदराबादविरुद्ध मागील 5 पैकी 4 सामने जिंकले असून हाच धडाका कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. (CSK vs SRH)

दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबादचा संघ कर्णधार एडन मारक्रमवर अधिक अवलंबून असेल. पॉवर प्लेमध्ये अनेक धक्के बसत असल्याने हैदराबादची सातत्याने पीछेहाट होत आली असून मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवानंतर या संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रायन लाराने मधल्या फळीने अधिक जबाबदारीने खेळत विजय खेचून आणले पाहिजेत, अशी अपेक्षा स्पष्टपणे नोंदवली होती. हॅरी ब्रूक व स्थानिक खेळाडू वॉशिंग्टन सुंदरकडून देखील सनरायजर्स हैदराबादला बर्‍याच अपेक्षा असणार आहेत.

हेही वाचा…

Back to top button