पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धीम्या गतीने षटक टाकल्याने लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार के.एल.राहुल याला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात लखनौने राजस्थान रॉयल्सचा १० धावांनी पराभव केला. (LSG vs RR)
याबाबत बोलताना आयपीएलने म्हटले की, "सद्य स्थितीत धीम्या गतीने षटक टाकणे हे आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. त्यामुळे लखनौचा कर्णधार के.एल.राहुलला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे." ३ तास २० मिनीटे एवढ्या वेळेत सामना संपवण्याचे आयपीएलचे लक्ष्य आहे. मात्र, धीम्या गतीने षटक टाकल्यामुळे सामना संपण्यासाठी ४ तास लागत आहेत. (LSG vs RR)
कार्ल मेयर्सची अर्धशतकी खेळी, मार्कस स्टोईनिस आणि आवेश खानच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने राजस्थानवर १० धावांनी विजय मिळवला. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. नाणेेफेक जिंकत राजस्थानने लखनौला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनौच्या संघाने २० षटकांअखेर १५४ धावा केल्या आणि राजस्थानसमोर १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. (LSG vs RR)