पुढारी ऑनलाईन डेस्क : मँचेस्टर सिटीने UEFA चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सिटीने बुधवारी (दि. १९ एप्रिल) बायर्न म्युनिचचा पराभव केला. हा सामना बायर्नचे होम ग्राउंड अलियान्झ एरिना येथे खेळवण्यात आला. (Champions League)
गेल्या आठवड्यात (दि.१२) सिटीने पहिल्या लेगच्या सामन्यात बायर्नचा ३-० असा पराभव केला होता. सिटीने उपांत्यपूर्व फेरीत दोन सामन्यांमध्ये एकूण ४-१ असा विजय मिळवला. सिटीचा संघ सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. २०१५-१६ मध्ये सिटी उपांत्य फेरीतून बाहेर पडले होते. त्यानंतर २०२०-२१ मध्ये चेल्सीविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात सिटीचा पराभव झाला होता. तर, रिअल माद्रिदने २०२१-२१ मध्ये उपांत्य फेरीत त्याचा पराभव केला होता. सलग दुसऱ्या वर्षी रिअल आणि सिटी यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. (Champions League)
पहिल्या लेगमधील सामन्यात ३-० असा विजय मिळवल्यानंतर मँचेस्टर सिटीचा संघ बायर्नच्या घरच्या मैदानावर दुसऱ्या लेगमध्ये उतरला. सुरुवातीच्या मिनिटांत सिटीच्या खेळाडूंनी अनेक चुका केल्या. सिटीने केलेल्या चुकांचा फायदा बायर्नला घेता आला नाही. बायर्नचे चाहते स्टेडियममध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देत होते. बायर्नने पूर्वार्धात अनेक संधी निर्माण केल्या पण, त्यांना गोल करण्यात यश आले नाही.
सामन्याच्या ३५व्या मिनिटाला बचावपटू ओपमेकानोच्या चुकीमुळे मँचेस्टर सिटीला पेनल्टी मिळाली. यामुळे सिटीला सामन्यात आघाडी घेण्याची सुवर्णसंधी होती. सिटीचा स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालांडने पेनल्टी घेण्यासाठी पुढे आला. परंतु, त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही.
पूर्वार्धात पेनल्टी हुकल्यानंतर उत्तरार्धात एर्लिंग हालांडने जोरदार पुनरागमन केले. त्याने ५७व्या मिनिटाला गोल करून मॅन्चेस्टर सिटीला सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सिटीच्या अकांजीच्या चुकीमुळे बायर्नला 81व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. या संधीचा फायदा घेत बायर्नचा कर्णधार जोशुआ किमिचने गोल करत सिटीला १-१ असे बरोबरीत रोखले. लेगच्या दुसऱ्या सामन्यात जरी बायर्नने सिटीला बरोबरीत रोखले असले तरी, अॅग्रीगेटमध्ये सिटीने बायर्नचा ४-१ ने पराभव करत चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
हेही वाचा;