RR vs LSG : विजयीपथावर परतण्याचे लखनौ सुपर जायंटस्चे लक्ष्य | पुढारी

RR vs LSG : विजयीपथावर परतण्याचे लखनौ सुपर जायंटस्चे लक्ष्य

जयपूर, वृत्तसंस्था : गुणतालिकेत आघाडीवर असणारा राजस्थान रॉयल्सचा संघ (RR vs LSG) येथील आयपीएल साखळी फेरीत लखनौ सुपर जायंटस्विरुद्ध वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज असून लखनौ सुपर जायंटस्समोर विजयपथावर परतण्याचे लक्ष्य असणार आहे. लखनौने आतापर्यंत 3 विजय व 2 पराभव अशी संमिश्र कामगिरी केली असून अगदी मोक्याच्या ठिकाणी त्यांचा सूर हरवला आहे. याची आणखी पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी त्यांना आता दक्ष राहावे लागेल.

यापूर्वी पंजाब किंग्जविरुद्ध शेवटच्या सामन्यात लखनौला मधल्या षटकात फारशा धावा जमवता आल्या नाहीत आणि यामुळे त्यांना अखेरीस 10 ते 15 धावा कमी पडल्या. के.एल. राहुल 56 चेंडूत 74 धावांसह बहरात परतल्याने लखनौला बराच दिलासा लाभला असला तरी मधल्या षटकात त्यांना शक्य तितक्या धावा जमवण्यावर पुरेपूर भर द्यावा लागणार आहे. काईल मेयर्स, निकोलस पूरन व मार्कस स्टोईनिस हे कोणत्याही गोलंदाजी फळीचा चोख समाचार घेऊ शकतात. मेयर्स पॉवर प्लेमध्ये उत्तम खेळत असला तरी त्याला या पहिल्या 6 षटकांत मोठी भागीदारी साकारण्यावर देखील तितकाच भर द्यावा लागेल. दीपक हुडा झगडत असल्याने मेयर्सवर अधिक जबाबदारी असेल.

यापूर्वी पंजाब किंग्जविरुद्ध लखनौने रवी बिश्नोईला अगदी उशिराने उतरवल्याचा बराच फटका बसला. बिश्नोई बिनचूक गुगलीच्या बळावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणू शकतो. त्यामुळे डेथ ओव्हर्ससाठी राखून ठेवण्याऐवजी त्याला मधल्या षटकात गोलंदाजीला आणणे हा कर्णधार के.एल. राहुलसाठी रामबाण उपाय ठरू शकतो. फिरकी अष्टपैलू कृष्णप्पा गौतम व कृणाल पंड्या यांनी आपली जबाबदारी जवळपास चोख पार पाडली आहे. जलद गोलंदाजांमध्ये मार्क वूड व अवेश खान उत्तम मारा करत आले असून, युद्धवीर सिंग चरकला येथे सातत्य राखता येईल. यापूर्वी पंजाबविरुद्ध पदार्पणाच्या लढतीत त्याने 2 बळी घेतले होते. (RR vs LSG)

दुसरीकडे, राजस्थानला नमवणे लखनौसाठी मात्र एखादा डोंगर सर करण्यासारखे असेल. राजस्थानने हॅट्ट्रिक विजयाच्या बळावर गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले असून यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन पॉवर प्लेमध्ये उत्तम धावा फटकावत आले आहेत. बटलर 204 धावांसह सर्वाधिक धावा जमवणारा फलंदाज ठरला असून जैस्वालने 149.45 च्या सरासरीने आतापर्यंत 136 धावांचे योगदान दिले आहे. आश्चर्य म्हणजे, गुजरातविरुद्ध ज्यावेळी बटलर-जैस्वाल अपयशी ठरले, त्यावेळी कर्णधार संजू सॅमसनने 32 चेंडूत 60 तर शिमरॉन हेटमायरने 26 चेंडूत 56 धावांची आतषबाजी करत ते संघाच्या मदतीला धावून आले. काहीवेळा देवदत्त पडिक्कल देखील उत्तम योगदान देण्यात यशस्वी ठरला; पण रियान परागला मात्र मिळालेल्या संधीचे सोने करता आलेले नाही.

रॉयल्सकडे युजवेंद्र चहल, अ‍ॅडम झाम्पा व रविचंद्रन अश्विन असे जागतिक दर्जाचे तीन अव्वल फिरकीपटू उपलब्ध असून प्रतिस्पर्ध्यांना सातत्याने पेचात टाकण्यात ते निष्णात आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध या संघाला फिरकीपटूंनीच विजय मिळवून दिले तर दिल्ली कॅपिटलविरुद्ध ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात 2 बळी घेत जोरदार धक्के दिले. मध्यमगती गोलंदाज संदीप शर्माने देखील अनुभव पणाला लावत ठराविक अंतराने गडी बाद केले आहेत.

Back to top button