शिंदे-अजित पवार हे फडणवीसांचे ‘अग्निवीर’ : निरंजन टकले | पुढारी

शिंदे-अजित पवार हे फडणवीसांचे ‘अग्निवीर’ : निरंजन टकले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘अग्निवीर’मध्ये युवकांना एक वर्षाचे प्रशिक्षण आणि तीन वर्षे सेवा, असे बंधन असल्याने देशाच्या सुरक्षिततेशी खेळण्याचा प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करातील अग्निवीर योजना राजकारणात आणली आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी आणली. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे देवेंद्र फडणवीसांचे अग्निवीर असून, प्रत्येकाला दोन वर्षे, अशी चार वर्षे सत्ता देऊन त्यांची सेवा व कारकीर्द संपुष्टात येईल, असी टीका ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक निरंजन टकले यांनी केली. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत टकले बोलत होते.

ते म्हणाले की, भारतातील माध्यम स्वातंत्र्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. माध्यम स्वातंत्र्यामध्ये 180 देशांत आपण 161 व्या स्थानावर आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. माध्यमांवर विविध पद्धतीने दबाव आणला जात आहे. यामुळे भारतामध्ये माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट झाली आहे. मोदींंनी ज्या-ज्या ठिकाणी डोके टेकवले, ते सर्व संपविण्याचे काम त्यांनी केले. मग ती संसद असो, लालकृष्ण अडवाणी असोत किंवा मुरली मनोहर जोशी असोत. काँग्रेसने या देशाला संविधान दिले. त्याच संविधानानुसार देश चालतो. देश मनुस्मृतीनुसार नक्कीच चालणार नाही.

मात्र, भाजपला देश मनुस्मृतीनुसार चालवायचा आहे. टीका होऊ लागल्याने मोदींनी संविधान बदलणार नाही, अशी गॅरंटी दिली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेले मुद्दे काँग्रेसच्या नावे खपवून स्वत:चा अजेंडा रेटू पाहत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानामुळे मोदी आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते जाती-धर्मांवरून आणि धार्मिक श्रद्धेवर आघात करीत आहेत. मोदी यांच्या प्रचारातून विकास गायब झाला असून, महागाईसह बेरोजगारीवर चकार शब्द बोलत नाहीत. मोदी जेवढे खोटे बोलत आहेत, तितका जनतेचा काँग्रे च्या न्यायपत्रावरील विश्वास वाढत चालला आहे.

हेही वाचा

Back to top button