IPL 2023 : उद्घाटन सोहळ्यात आसमंतही उजळणार | पुढारी

IPL 2023 : उद्घाटन सोहळ्यात आसमंतही उजळणार

अहमदाबाद, वृत्तसंस्था : जगातील सर्वात मोठी टी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) उद्यापासून आयपीएलचा थरार रंगणार असून सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे. 31 मार्च रोजी आयपीएल 2023 मधील पहिला सामना चेन्नई आणि गुजरात संघात खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे. यामध्ये बॉलीवूड गायक अरिजित सिंग, तमन्ना भाटिया सारखे स्टार्स परफॉर्म करणार आहेत. केवळ जमीनच नाही तर आकाशही उजळून निघेल. फटाक्यांची आतषबाजी तर होईलच, पण सुंदर ड्रोन लाईट शोही आयोजित केला जाईल. यामध्ये ड्रोनमधून वेगवेगळी छायाचित्रे चमकताना दाखवण्यात येणार आहेत. उद्घाटन समारंभानंतर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याने हंगामाची सुरुवात होईल. या सामन्यापूर्वी विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

आयपीएलचा उद्घाटन सोहळा तब्बल 5 वर्षांनंतर होणार आहे. शेवटच्या वेळी आयपीएलचा उद्घाटन सोहळा 2018 मध्ये झाला होता, तेव्हापासून दरवर्षी आयपीएल होत असे, पण उद्घाटन सोहळा होऊ शकला नाही. 2019 मध्ये पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता, त्यामुळे बीसीसीआयने उद्घाटन समारंभ न करण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलच्या उद्घाटन समारंभातील ड्रोन लाईट शोचे द़ृश्य तुम्ही फोटोमध्ये पाहत आहात, त्याचप्रकारे ड्रोनला जोडलेल्या लाईटसह आकाशात सुंदर सादरीकरण होणार आहे. ज्यामध्ये आयपीएलचा लोगो बनवला जाईल, ट्रॉफी आणि संघाचे लोगो प्रकाशित केले जातील. तमन्ना भाटिया आणि अरिजित सिंग आयपीएलमध्ये परफॉर्म करणार आहेत.

इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाविषयी उत्सुकता (IPL 2023)

आयपीएलच्या 16 व्या हंगामात बीसीसीआयने एक नवा नियम आणला आहे. आता आयपीएलच्या सामन्यात कोणताही संघ 11 नाही तर 12 खेळाडू खेळवू शकतो. क्रिकेटच्या पारंपरिक नियमानुसार संघ 11 खेळाडूच खेळवू शकत होते. मात्र बीसीसीआयने आता इम्पॅक्ट प्लेअर हा नवा नियम आणून संघांना एक अतिरिक्त खेळाडू सामन्याच्या कोणत्याही टप्प्यावर संघात खेळवण्याची मुभा दिली आहे. मात्र जरी सामन्यात 12 खेळाडू खेळवण्याची मुभा असली तरी प्रत्यक्ष मैदानावर 11 खेळाडू खेळताना दिसतील. यासाठी बीसीसीआयने काही नियम घालून दिले आहेत.

काय आहेत इम्पॅक्ट प्लेअरचे नियम? (IPL 2023)

बीसीसीआयच्या नव्या नियमामुळे फ्रेंचायजींना आता सामन्यादरम्यान, इम्पॅक्ट प्लेअर आपल्या प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट करता येणार आहे. हा खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना वापरता येणार आहे. यासाठी कर्णधाराला संघासोबतच आपल्या चार बदली खेळाडूंची नावे नाणेफेकीनंतर द्यावी लागणार आहेत. यातील एक खेळाडू सामन्यादरम्यान खेळवता येणार आहे. हा इम्पॅक्ट प्लेअर सामन्यावेळी बॅटिंग, बॉलिंग किंवा फिल्डिंग करू शकतो.
मात्र जर संघाने प्लेईंग 11 मध्ये 4 विदेशी खेळाडू समाविष्ट केले असतील तर इम्पॅक्ट प्लेअर हा भारतीय खेळाडूच असला पाहिजे. जर संघाने 4 पेक्षा कमी विदेशी खेळाडू संघात घेतले तरच त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून विदेशी खेळाडू समाविष्ट करता येईल.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, संघाने चार बदली खेळाडूंमध्ये समाविष्ट केलेल्या विदेशी खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरता येऊ शकते. जर संघ विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरणार असेल तर कोणत्याही परिस्थितीत मैदानावर 5 वा विदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी असणार नाही.
इम्पॅक्ट प्लेअर हा इनिंगच्या सुरूवातीला किंवा षटक पूर्ण झाल्यानंतर वापरता येईल.
फलंदाजीचा विचार केला तर इम्पॅक्ट प्लेअर हा विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर झाल्यावर षटकाच्या मधे कधीही घेता येईल.
जरी इम्पॅक्ट प्लेअरला फलंदाजी, गोलंदाजी, फिल्डिंग करता येत असली तरी त्याला संघाचा कर्णधार होता येणार नाही.

सर्वात मोठी सीमारेषा

मैदानाची सीमा भारतातील इतर कोणत्याही क्रिकेट मैदानाच्या तुलनेत मोठी आहे. अहमदाबादच्या मैदानाच्या कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्स, डीप मिड-विकेट एरियाची सीमा 75-80 मीटर आहे. स्क्वेअर लेग आणि डीप पॉईंट बाउंड्री खेळपट्टीपासून 67 ते 74 मीटर अंतरावर आहे. या मैदानावर 18 आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी 8 सामने प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने जिंकले आहेत, तर 10 सामन्यांत लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ विजयी झाला आहे. या मैदानावरील येथे सर्वोच्च धावसंख्या 3 बाद 240 आहे. कोहलीच्या आरसीबीने 2012 मध्ये दिल्ली विरुद्ध हा धावांचा डोंगर रचला होता. तर 2017 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्धच्या सामन्यात बंगळूर संघाच्याच नावावर सर्वात कमी धावसंख्येची (49) नोंद झाली आहे.

13 भाषांमध्ये कॉमेंट्री

आयपीएलमध्ये यावेळी प्रथमच पंजाबी, ओरिया आणि भोजपुरी भाषांमध्येही कॉमेंट्री होणार आहे. म्हणजेच यावेळच्या आयपीएलमध्ये हिंदी आणि इंग्रजीशिवाय अन्य 13 भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकायला मिळणार आहे. यात इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली, मल्याळम, पंजाबी, ओरिया आणि भोजपुरी या भाषांचा समावेश आहे. स्टार स्पोर्टस्वर हिंदी, इंग्रजीसह 9 भाषांमध्ये कॉमेंट्री होईल. तर जिओ सिनेमा पवर 13 भाषांमध्ये असेल.

रोहित शर्माची दांडी

आयपीएल संघाच्या कर्णधारांनी गुरुवारी नरेंद्र स्टेडियवर एकत्र येत ट्रॉफीसोबत फोटोशूट केले. मात्र, त्यात एक धक्कादायक बाब समोर आली. ट्रॉफीसोबत 9 कर्णधार उपस्थित होते. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने दांडी मारली. ट्रॉफीसोबतच्या फोटोशूटमधून रोहित गायब झाल्याने सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. रिपोर्टसमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रोहित पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव एमआयचे कर्णधारपद भुषवू शकतो. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामच्या अनुपस्थितीमुळे त्याच्या जागी भुवनेश्वर कुमारने फोटोशूटमध्ये भाग घेतला.

Back to top button