टी-20 क्रिकेटमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजीची वाट लागली : मायकल हसी | पुढारी

टी-20 क्रिकेटमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजीची वाट लागली : मायकल हसी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्हीही सामन्यांत फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या खराब खेळीवर माजी फलंदाज मायकल हसी भडकला असून, टी-20 क्रिकेटमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजीची वाट लागली आहे, असा आरोप त्याने केला आहे.

हसी म्हणाला की, 10-15 वर्षांपूर्वीपर्यंत असे फटके कसोटीत पाहायला मिळत नव्हते; पण आता फलंदाजांनी तिरपे फटके मारायला सुरुवात केली आहे. दिल्ली कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे बहुतांश फलंदाज स्विप शॉटस् खेळून बाद झाले. त्यांनी सरळ शॉट मारण्याचा प्रयत्नदेखील केला नाही; परंतु स्विप शॉट खेळण्याचा अधिक प्रयत्न केला आणि ते स्वस्तात माघारी परतले. यावरून त्यांना आता टीकेचा सामना करावा लागत आहे. टी-20 क्रिकेटमुळेच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कसोटी सामन्यांमध्ये असे फटके खेळायला सुरुवात केली आहे, असे मायकल हसीने म्हटले आहे.

हसीने सांगितले की, हे सर्व काही टी-20 क्रिकेटच्या प्रभावामुळे होत आहे. यातील बहुतेक शॉटस् आपण लहान फॉरमॅटमध्ये पाहतो. असे रॅम्प शॉटस् 10-15 वर्षांपूर्वी पाहिले नव्हते. स्विप आणि रिव्हर्स स्विप खेळणे ही परिपक्व फलंदाजीजी निशाणी आहे. चांगली गोष्ट आहे की, तुम्ही ते शॉटस् खेळू शकता; पण ते जास्त महत्त्वाचे आहेत का, हे पाहायला हवे. हा शॉट तुम्ही कोणत्या वेळी वापरत आहात आणि समोरचा गोलंदाज कोण आहे, हे पाहावे लागेल. मला वाटत नाही की, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी योग्यवेळी योग्य गोलंदाजांविरुद्ध त्यांचे शॉटस् खेळले आहेत, असे हसीने ‘फॉक्स क्रिकेट’शी संवाद साधताना म्हटले.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत भारताचे वर्चस्व

भारतीय संघ सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून रोहितसेनेने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या दोन सामन्यांत कोहलीने काही खास कामगिरी केली नाही, तरीदेखील त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा आकडा पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने दिल्ली येथे झालेल्या दुसर्‍या सामन्यात 64 धावा केल्या.

Back to top button