Suzie Bates: महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये 1000 धावा फटकावणारी पहिली क्रिकेटर | पुढारी

Suzie Bates: महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये 1000 धावा फटकावणारी पहिली क्रिकेटर

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्सने (Suzie Bates) शुक्रवारी (दि. 17) रात्री महिला टी-20 विश्वचषकात इतिहास रचला. तिने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 81 धावांची नाबाद खेळी खेळली, या स्फोटक खेळीनंतर महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत 1000 धावांचा टप्पा गाठणारी ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

यासोबतच हा टप्पा गाठणारी ती जगातील तिसरी खेळाडू ठरली. सुझी बेट्सपूर्वी (Suzie Bates) श्रीलंकेचा महेला जयवर्धने आणि भारताचा विराट कोहली यांनी पुरुष टी-20 विश्वचषकात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. सुझी बेट्सच्या शानदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशवर 71 धावांनी मोठा विजय मिळवला. याबरोबरच महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत किवींनी आपले खाते उघडले.

सुझी बेट्सने (Suzie Bates) आतापर्यंत महिला टी-20 विश्वचषकात खेळल्या गेलेल्या 35 सामन्यांमध्ये 31.56 च्या सरासरीने 1010 धावा केल्या आहेत. या दरम्यान तिची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 94 आहे. ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग आणि वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर या विश्वचषकातील हजार धावांच्या जवळपास पोहोचल्या आहेत. या दोन्ही फलंदाजांनी या क्षणी 900 हून अधिक धावा आपल्या खत्यात जमा केल्या आहेत.

महिला टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणा-या महिला खेळाडू

सुझी बेट्स – 1010
मेग लॅनिंग – 932
स्टेफनी टेलर – 926
एलिसा हिली – 898
शार्लोट एडवर्ड्स – 768
मिताली राज – 726

Back to top button