

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. लीग टप्प्यात एकूण 18 डबल हेडर सामने रंगणार आहेत. हे सर्व डबल हेडर सामने शनिवार आणि रविवारी खेळवले जातील. पहिला सामना दुपारी आणि दुसरा सामना संध्याकाळी होईल. आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) दोनदा आमनेसामने येणार आहेत.
या दोन संघांमधील 6 मे रोजी होणारा दुसरा सामना हा आयपीएलच्या इतिहासातील 1000 वा सामना असेल. या हंगामात सर्व संघासह सीएसके त्यांच्या घरच्या मैदानावर (एम ए चिदंबरम स्टेडियम) सामने खेळणार आहे. मुंबई आणि चेन्नई दरम्यानचे संघर्षपूर्ण सामने पहायला प्रेक्षकांना खूप आवडते. हे दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत.
रोहितच्या नेतृत्वाखाली एमआयने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. 2022 चा मागील हंगाम दोन्ही संघांसाठी चांगला नव्हता. त्यावेळी मुंबई-चेन्नईने गुणतालिकेत अक्षरश: तळ गाठला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्सने पहिल्याच हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.
आयपीएल 2019 ही शेवटची वेळ होती जेव्हा भारतातील सर्व संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळले होते. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे, ही स्पर्धा मार्च ते मे ऐवजी सप्टेंबर-नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळली गेली. 2021 मध्ये भारतात आयपीएल आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु, कोरोनाची प्रकरणे आढळल्यानंतर, स्पर्धा थांबवण्यात आली. त्यानंतर स्पर्धेचा उर्वरीत हंगाम सप्टेंबरमध्ये यूएई येथे खेळला गेला.